नवी दिल्लीत अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेच्या विरोधातील निदर्शनांच्या वेळी पोलीस अधिकाऱ्याने एका मुलीला थप्पड मारल्याच्या घटनेवरून सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली पोलीसप्रमुखांना स्पष्टीकरण मागितले आहे. न्यायमूर्ती जी. एस. सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली खंडपीठाने पोलीस आयुक्तांना निदर्शनावेळी मुलीला मारहाण का करण्यात आली याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले.
अलीगडमध्ये ६५ वर्षीय वृद्धेला अमानुष मारहाण झाली. त्याबाबतही उत्तर प्रदेशच्या मुख्य सचिवांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले. अशा घटना देशासाठी मानहानीकारक आहेत अशा शब्दात न्यायालयाने खडसावले. ज्या गोष्टी जनावर करू शकत नाही, अशा बाबी पोलीस अधिकारी देशातील विविध भागांत करत असल्याचे न्यायालयाने अलीगडच्या घटनेचा
उल्लेख करत सांगितले. तुमच्या सरकारकडे थोडी तरी लाज शिल्लक आहे काय, अशी विचारणा न्यायालयाने करत उत्तर प्रदेश सरकारचे वकील गौरव भाटिया यांना खडसावले. राज्य सरकारला फटकारताना न्यायालयाने नैतिकतेच्या मुद्दय़ावर रेल्वे अपघातानंतर लालबहादूर शास्त्रींनी रेल्वे मंत्रिपदाच्या दिलेल्या राजीनाम्याची आठवण करून दिली. नि:शस्त्र महिलेला तुम्ही कसे मारू शकता? तुमची संवेदना कोठे गेली, अशी विचारणा न्यायालयाने केली.
दिल्लीमधील निदर्शनांच्या वेळी साहाय्यक पोलीस आयुक्तांनी मुलीला चार वेळा मारहाण केली. त्या पोलीस अधिकाऱ्याला नंतर निलंबित करण्यात आले. अलीगडमधील घटनेत सहा वर्षीय मुलीवरील बलात्कार आणि हत्येच्या घटनेचा निषेध करताना निदर्शनांवेळी वृद्ध महिलेला पोलिसांनी अमानुष मारहाण केली होती.