गुजरातच्या भावनगरमध्ये २९ मार्च रोजी झालेल्या एका दलित युवकाच्या हत्याप्रकरणाचा छडा लावण्यात भावनगर पोलिसांना यश आलं आहे. २१ वर्षांच्या प्रदिप राठोड याची हत्या घोड्यावर बसतो म्हणून किंवा घोडा खरेदी केल्यामुळे करण्यात आली नाही असा खुलासा पोलिसांनी केला आहे. तर एका विवाहित महिलेची छळवणूक केल्यामुळे प्रदिपची हत्या झाल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे युवकाच्या वडिलांनी मात्र, पोलिसांचं स्पष्टीकरण पटत नसून उच्चवर्णीय लोकांनीच प्रदिपची हत्या केली असं म्हटलं आहे.

हत्येच्या घटनेच्या दोन महिने आधीपासून प्रदिप संबंधित महिलेचा छळ करत होता, तिच्याकडे शारीरीक सुखाची तो मागणी करत होता. त्रासलेल्या पीडितेने याबाबत स्वतःच्या पतीलाही सांगितलं होतं. त्यानंतर २९ मार्च रोजी महिलेच्या पतीनेच प्रदिपची हत्या केली आणि तो कुटुंबियांसह फरार झाला होता, असा खुलासा पोलिसांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

२९ मार्च रोजी टिंबी गावचा रहिवासी असलेल्या प्रदिपचा मृतदेह रस्त्यावर सापडला होता. त्यानंतर त्याच्या वडिलांनी घोडा खरेदी केल्यापासून गावातील उच्चवर्णीय लोकांकडून प्रदिपला धमक्या मिळत होत्या, आणि त्यामुळेच त्याची हत्या केल्याचा आरोप केला होता.