वाराणसीत बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा काही भाग कोसळून १८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे प्रशासनावर टीका होत असताना उत्तर प्रदेश पोलिसांनी आपण धोक्याची सूचना देणारी पत्रं पाठवूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचा दावा केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी नोव्हेंबर महिन्यापासून आपण उत्तर प्रदेश राज्य पूल ब्रिज कॉर्पोरेशनला (युपीएसबीसी) पाच पत्रं पाठवली होती अशी माहिती दिली आहे. तसंच बांधकामादरम्यान वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात एफआयआरही दाखल करण्यात आला होता.

पोलीस महानिरीक्षक दिपक रतन यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आम्ही नोव्हेंबर महिन्यापासून युपीएसबीसीला पाच पत्रं पाठवली असून बांधकादरम्यान वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्यास सांगितलं होतं. जेव्हा एखाद्या पुलाच्या काही भागाचं बांधकाम सुरु असतं तेव्हा त्यांनी वाहतुकीसाठी आपल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करणं अपेक्षित असतं. मदतीसाठी ते पोलिसांना विनंती करु शकतात. पण आम्हीच त्यांना त्यांच्या त्रुटी दाखवून देत होतो. पण त्यांनी काहीच लक्ष दिलं नाही”.

दरम्यान युपीएसबीसीचे व्यवस्थापकीय संचालक रजन मित्तल यांनी बांधकाम सुरु असताना आपण सतत जिल्हा प्रशासन अधिकारी आणि पोलिसांशी संपर्क साधत होतो असं म्हटलं आहे.

“आमच्यावर काम वेळेत पूर्ण करण्याचा दबाव होता, मात्र आम्ही क्वालिटीत कोणतीही तडजोड केली नव्हती आणि ही गोष्ट तपासात समोर येईल. तीन शिफ्टमध्ये काम सुरु होतं. पण वाहतूक कोंडी मुख्य समस्या होती. एका बाजूला रेल्वे स्टेशन आणि दुसरीकडे बस स्टँण्ड असल्याने कामात अडथळा येत होता. जिथपर्यंत वाहतूक व्यवस्थापनाचा प्रश्न आहे ती आमची जबाबदारी नाही. आम्ही त्यासंबंधी प्रशासनाशी आणि पोलिसांशी सतत बोलत होतो”, असं रजन मित्तल यांनी सांगितलं आहे.