तुम्ही सर्वांनी डोंगर पोखरुन उंदीर निघाला ही म्हण ऐकली असेलच. असाच काहीसा प्रकार दिल्ली पोलिसांसोबत झाला आहे. रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना तळमजल्यावरील एका खोलीतून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंध येत असल्याचा फोन आला. भाडेकरुचाही काही पत्ता नसून, बाहेरुन कुलूप लावण्यात आलं असल्याचं पोलिसांना सांगण्यात आलं. पुढील १० मिनिटांत पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

शेजाऱ्यांकडून माहिती घेत पोलिसांनी घरमालकाला फोन करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा फोन स्विच ऑफ लागत होता. आता तर पोलिसांना हा काही गंभीर आणि संशयास्पद प्रकार वाटू लागला. घऱमालक आणि भाडेकरु दोघेही गायब झाल्याने संशयाची सुई त्यांच्याकडे होती. पोलिसांनी सकाळपर्यंत वाट पहायची, अन्यथा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करायचा ठरवलं. जवळपास १० तास पोलिसांनी घराभोवरती कडक पहारा दिला.

स्थानिक पोलिसांनी फॉरेन्सिक टीमलाही घटनास्थळी बोलावलं होतं. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अखेर घरमालकाशी संपर्क झाला. त्याने भाडेकरु घऱ सोडून गेला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी घरमालकाला चावी घेऊन बोलावलं. कुलूप काढून पोलिसांनी आतमध्ये जाताच शोध सुरु केला. पण यावेळी पोलिसांना दिसला तो मेलेला उंदीर. उंदीर अक्षरक्ष: सडला असल्याने दुर्गंध येत होता. अखेर पोलिसांनी सुटकेचा निश्वास टाकला. पण शेजाऱ्यांना मात्र हसू आवरत नव्हते. पोलिसांनी घऱमालकाला घराची स्वच्छता करण्याची सूचना दिली आणि तेथून रवाना झाले.