निर्भया प्रकरणावर चारही दोषींना दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेली फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. याचा राजकीय वर्तुळातून स्वागत होतंय. दोषींचे वकील सोडले तर बाकी सर्वजण या दोषींना दिल्या गेलेल्या शिक्षेचं स्वागत करत आहेत.

आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी या आरोपींना कठोर शिक्षा झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलंय. त्यांनी ट्वीट करत निर्भयाला झालेल्या बलात्काराबद्दल एक समाज म्हणून तिची माफी मागितली आहे.

‘आप’चे आणखी एक नेते आशिष खेतान यांनी सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय ऐतिहासिक आहे, असं म्हटलं आहे.

केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी या निकालाचं स्वागत केलं. पण एएनआयला दिलेल्या त्यांच्या प्रतिक्रियेत त्यांनी ‘या प्रकरणात न्याय मिळायला उशीर झाला’ अशी खंत व्यक्त केली. भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी ट्वीट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या. निर्भयासोबत जे झालं माणुसकीला काळीमा फासणारं होतं असं त्यांनी म्हटलं.

निर्भयाच्या वडिलांनी चारही दोषींना झालेल्या शिक्षेबद्ल समाधान व्यक्त केलं आहे. त्यांना मिळालेली शिक्षा ही माझ्या कुटुंबासाठी मोठा विजय आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी एएनआयशी बोलताना व्यक्त केली.