हैदराबाद स्फोटांचे संसदेत पडसाद
काही वेळेसाठी पोलीस हटविले तर आम्ही २५ मिनिटांत सारे काम तमाम करू, अशी धमकी देणाऱ्या एका लोकसभा खासदाराच्या विधानाचा हैदराबादमधील गुरुवारी झालेल्या स्फोटांशी काय संबंध आहे, असा सवाल शुक्रवारी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला. वारंवार होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांविषयी देशातील सर्व राजकीय पक्षांनी एकसमान दृष्टीकोन बाळगायला हवा, अशीही भूमिका त्यांनी मांडली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हैदराबादमध्ये झालेल्या दुहेरी बॉम्बस्फोटांचे तीव्र पडसाद आज लोकसभेत आणि राज्यसभेत उमटले. पहाटेच हैदराबादला जाऊन परिस्थितीचा आढावा घेणारे केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दुपारी दिल्लीत परत येऊन दोन्ही सभागृहांमध्ये निवेदन केले. पण या निमित्ताने विरोधकांनी, विशेषत भाजपकडून सुषमा स्वराज आणि राज्यसभेत वैंकय्या नायडू यांनी मनमोहन सिंग सरकारवर टीकेची झोड उठविण्याची संधी सोडली नाही.
सुषमा स्वराज यांनी हैदराबादचे लोकसभा खासदार असादुद्दीन ओवैसी यांनी अलीकडेच केलेल्या प्रक्षोभक भाषणाचा दाखला देत गुरुवारच्या बॉम्बस्फोटांना नवा आयाम देण्याचा प्रयत्न केला. काही काळासाठी पोलिसांना हटविले तर आम्ही २५ मिनिटांत सर्वांचे काम तमाम करू, असे या सदस्याने म्हटले होते. त्याच्या प्रक्षोभक भाषणाचा या घटनेशी काय संबंध आहे, असा सवाल स्वराज यांनी केला. अशा घटनांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांच्या आप्तांना द्यावयाची मदतीची रक्कम एकसमान का असू नये, असाही सवाल स्वराज यांनी केला. संसदेवरील हल्ल्याचा सूत्रधार मोहम्मद अफझलची फाशी एका व्होटबँकेच्या राजकारणापोटी नऊ वर्षे लांबली आणि दुसऱ्या व्होटबँकेच्या राजकारणामुळे त्याला फाशी देण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्यथा नऊ वर्षांंच्या विलंबाचे औचित्य काय आहे, असा सवाल स्वराज यांनी केला. दहशतवादाशी आम्ही समान विचार ठेवून लढत नसल्याचा ठपका ठेवून सुषमा स्वराज म्हणाल्या की, अनेकदा अतिरेक्यांच्या मानवाधिकारांचा विचार करून त्यांच्याविषयी नरमाई दाखविली जाते. अनेकदा तुमच्या राज्यांमध्ये असे घडू शकते, असे राज्य सरकारांना सांगून केंद्र सरकार आपल्या कर्तव्यांची पूर्तता करते. हैदराबादच्या स्फोटातही असेच झाले. खुद्द गृहमंत्री शिंदे म्हणतात की आम्ही पूर्वसूचना दिली होती. पूर्वीही अनेकदा असे घडले आहे. पण माहिती असूनही घटना घडते तेव्हा दोष दुप्पट होतो. माहिती असताना केंद्र आणि राज्य सरकार काय करीत होते. अतिरेकी निर्दोष लोकांना ठार करून आपले काम करतात आणि आम्ही केवळ माहिती देऊन हातावर हात ठेवून बसतो. हे असे प्रश्न आहेत जे नेहमी उपस्थित होतात. दहशतवादाशी आंतरराष्ट्रीय पातळीवर लढण्यासाठी अन्य देशांना सोबत घेण्यापूर्वी देशाला एकजूट व्हावे लागेल. त्यापूर्वी तमाम राजकीय पक्षांना एकजूट होऊन समान दृष्टीकोन तयार करावा लागेल, असे स्वराज म्हणाल्या. या मुद्यांवर वेळ निश्चित करून चर्चा करण्यात येईल, अशी ग्वाही संसदीय कामकाज मंत्री कमलनाथ यांनी दिली.
तत्पूर्वी,  शिंदे यांनी या घटनेविषयी उभय सभागृहांमध्ये निवेदन केले. या भ्याड हल्ल्यास कारणीभूत ठरलेल्या अतिरेक्यांना हुडकून कठोर शिक्षा देण्यासाठी सरकार प्रतिबद्ध आहे, असे निवेदन शिंदे यांनी केले. हैदराबादहून शिंदे परत येण्यापूर्वी लोकसभेत झालेल्या अल्पकालीन चर्चेत माकपनेते वासुदेव आचार्य, समाजवादी पक्षाचे मुलायमसिंह यादव, बसपचे दारासिंह चौहान, जदयुचे शरद यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंडोपाध्याय, तेलगू देसमचे नामा नागेश्वर राव, द्रमुकचे टी. आर. बालू, बिजू जनता दलाचे भ्रातृहरी महताब, अण्णाद्रमुकचे थंबी दुराई, शिवसेनेचे अनंत गीते, भाकपचे गुरुदास दासगुप्ता आदी सदस्यांनी हैदराबाद बॉम्बस्फोटांचा तीव्र शब्दात निषेध केला.