वयाची सत्तरी पार केल्यावर सक्रिय राजकारणात राहू नये, असे वक्तव्य ज्येष्ठ काँग्रेस नेते जनार्दन द्विवेदी यांनी केल्याने नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे द्विवेदी पुढच्या महिन्यात ६९ व्या वर्षांत प्रवेश करीत असून आपले महत्त्व कमी झाल्याची खंतही त्यांना आहे.
भाजपच्या संसदीय मंडळातून अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी या नेत्यांची गच्छंती झाल्याच्या पाश्र्वभूमीवर द्विवेदी यांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता काँग्रेसमध्येही मोठे फेरबदल होतील अशी चर्चा सुरू असताना द्विवेदी यांनी हे वक्तव्य केले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे स्थित्यंतर होते, राजकारणातही ते गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचा अर्थ ज्येष्ठांनी राजकारणातून निवृत्त व्हावे असा होत नाही, अशी सारवासारव त्यांनी केली. यापूर्वी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्यांनी द्विवेदी अडचणीत आले आहेत.