News Flash

दादरी हत्या प्रकरणावरून राजकारण

या प्रकरणी मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ओवैसी यांनी टीका केली.

हा धर्माच्या नावावरील खून- ओवेसी * धार्मिक रंग देऊ नका – शर्मा

गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून उत्तर प्रदेशातील दादरी येथील एका व्यक्तीची गावकऱ्यांनी हत्या केल्याच्या मुद्दय़ावरून भाजपवर आरोप, तसेच विविध पक्षांचे राजकारण सुरू झाले आहे. हा धर्माच्या नावावर झालेला पूर्वनियोजित खून असल्याचा आरोप एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केला असून, मुख्यमंत्री अखिलेश कुमार यादव यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे, तर या घटनेला धार्मिक रंग देऊ नये, असे आवाहन करतानाच तिची सीबीआयकरवी निष्पक्ष चौकशी व्हावी, असे केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांनी म्हटले आहे.

अ.भा. मजलिस-ए-मुस्लीम इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) या संघटनेचे नेते व हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी शुक्रवारी मृताच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हा हल्ला गोमांसाच्या कारणामुळे झाला नसून, मोहम्मद अख्लाक याला धर्माच्या नावावर मारण्यात आले आहे. हा अपघात नसून पूर्वनियोजित व थंड डोक्याने केलेला खून असल्याचा आरोप त्यांनी केला.

या प्रकरणी मौन बाळगल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही ओवैसी यांनी टीका केली. त्यांचा बहुत्ववादावर आणि कायद्याचे पालन करण्यावर विश्वास असेल, तर त्यांनी किमान ट्विटरवर शोकसंदेश पाठवायला हवा होता. ‘सब का साथ, सब का विकास’ हा नारा मोदी यांनी प्रत्यक्षात आणायला हवा, असेही ते म्हणाले. सांस्कृतिकमंत्री असलेले महेश शर्मा यांनी किमान या घटनेचा विनाशर्त निषेध करण्याचा प्रामाणिकपणा दाखवायला हवा, अशीही अपेक्षा ओवे सींनी व्यक्त केली.

स्थानिक खासदार महेश शर्मा यांनीही शुक्रवारी मृताच्या कुटुंबाला भेट दिली आणि ही घटना म्हणजे ‘अपघात’ असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ‘‘हा आपल्या संस्कृतीवरील कलंक असून सुसंस्कृत समाजात अशा घटनांना स्थान नाही. ही घटना पूर्वनियोजित नसून केवळ अपघाताने घडली आहे. या घटनेचा सीबीआयमार्फत निष्पक्ष तपास होऊन दोषींना शिक्षा व्हायला हवी. मात्र, तपासाच्या नावावर निर्दोष लोकांचा छळ होऊ नये,’’ असे शर्मा म्हणाले. या प्रकरणी कायद्याने त्याचे काम करायला हवे, असे सांगून या घटनेला राजकीय किंवा धार्मिक रंग देण्याच्या प्रयत्नांचा शर्मा यांनी निषेध केला. घटना घडलेल्या खेडय़ातील मंदिरात शर्मा यांनी गावकऱ्यांची बैठक घेतली आणि गावातील मुस्लीम कुटुंबांचे रक्षण करण्याची हमी हिंदू कुटुंबांनी दिली असल्याचे सांगितले.

अखिलेश यांची पंतप्रधानांवर टीका

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीही या प्रकरणी मौन तोडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. असे मुद्दे उपस्थित करून हे लोक देशाच्या धर्मनिरपेक्षतेच्या प्रकृतीला धक्का लावत असल्याचा आरोप करून, हिंमत असल्यास त्यांनी गोमांसाच्या निर्यातीवर बंदी घालून दाखवावी, असे आव्हानही यादव यांनी दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 3, 2015 1:32 am

Web Title: politicos spar over dadri lynching
टॅग : Dadri Lynching
Next Stories
1 ..तर महिलांसाठी मोबाइलमध्ये संकटनिवारक बटण ; मनेका यांची माहिती
2 प्लुटोच्या शॉरॉन उपग्रहाचा भूगर्भीय इतिहास प्रकाशात
3 पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव भारताने फेटाळला ; दहशतवाद व चर्चा एकाचवेळी अशक्य-सुषमा स्वराज
Just Now!
X