काश्मीरच्या पूँछ जिल्ह्यात सध्या भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक सुरू झाली आहे. येथील सचिवालय इमारतीच्या परिसरात ही चकमक सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिवालयाच्या इमारतीत कालपासून काही दहशतवादी लपून बसले आहेत. आज सकाळपासून थोड्याथोड्या वेळानंतर दहशतवादी गोळीबार करत आहेत. भारतीय सुरक्षा दलांकडूनही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देण्यात येत असून सध्या दहशतवादी लपून बसलेल्या नेमक्या ठिकाणाचा शोध लावण्यासाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे.
पीर पांजाल खोऱ्यातील पूँछ क्षेत्रात दहशतवाद्यांनी रविवारी ९३ ब्रिगेड मुख्यालयावर हल्ला चढवला होता. याठिकाणी बांधकाम चालू असलेले सचिवालय व एका निवासी घरात दहशतवादी लपले आहेत. आतापर्यंतच्या चकमकीत तीन दहशतवादी मारले गेले आहेत. दरम्यान सुरक्षा रक्षकांना एका घरात बंधक बनवून ठेवलेल्या वृद्ध दाम्पत्याची सुटका करण्यात यश आले आहे. तसेच या हल्ल्यात पोलीस कॉन्स्टेबल रजिंदर कुमार हे शहीद झाले. तर पोलीस उपनिरीक्षक मंझूर अहमद हे हल्ल्यात गंभीर जखमी झाले होते.
नौगाम भागात नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांनी रविवारी या भागात काही संशयास्पद हालचाली पाहिल्या. त्या रोखण्याचा प्रयत्न केला असता घुसखोरांनी लष्करी चौकीवर हल्ला केला. याला लष्कराने जोरदार प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना ठार मारले होते. तसेच शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला होता. युद्धकाळात वापरतात तशी सामुग्री त्यांच्याकडे सापडली आहे.