ख्रिश्चन धर्माचे सर्वोच्च नेते पोप फ्रान्सिस यांनी इराक भेटीत शिया धर्मगुरू अयातोल्ला अली सिस्तानी यांच्याशी चर्चा करून त्यांना शांततामय सहअस्तित्वाचा संदेश दिला. इराकने अल्पसंख्याक समुदायासमवेत शांततेने रहावे असे त्यांनी नजाफ शहरात झालेल्या चर्चेत सांगितले.

अयातोल्ला अल सिस्तानी यांनी सांगितले की, धार्मिक नेतेच इराकमधील ख्रिश्चनांचे संरक्षण करीत असून त्यांनाही इराकी लोकांसारखेच समान अधिकार आहेत. त्यांच्याबरोबर आम्ही शांततेने व आनंदात रहात आहोत.

व्हॅटिकनने दिलेल्या माहितीनुसार पोप फ्रान्सिस यांनी सिस्तानी यांचे ख्रिश्चनांच्या संरक्षणाबाबत आवाज उठवल्याबाबत आभार मानले. इराकमध्ये अनेक वेळा ख्रिश्चनांना छळाचा सामना करावा लागला होता. अल सिस्तानी (वय ९०) हे शिया इस्लामिक धर्मगुरू असून त्यांचा राजकीय हस्तक्षेप इराकला आकार देण्यात महत्त्वाचा ठरला आहे. सिस्तानी यांच्या घरी फ्रान्सिस त्यांना भेटले.

शनिवारी सकाळी फ्रान्सिस  (वय ८४) यांच्या वाहनांचा काफिला नजाफच्या अरुंद गल्ल्यांतून मार्ग काढीत सिस्तानी यांच्या निवासस्थानी आला. त्यावेळी रसूल स्ट्रीट येथील सोनेरी घुमट असलेल्या इमाम अली दग्र्याजवळ गर्दी झाली होती. फ्रान्सिस हे बुलेट प्रुफ मर्सिडीझ बेंझ गाडीतून आले होते. ते नंतर काही अंतर चालत सिस्तानी यांच्या घरी गेले, ते घर भाडय़ाचे आहे. पारंपरिक पोशाख केलेल्या इराकी लोकांनी त्यांचे स्वागत केले. सुमारे चाळीस मिनिटे सकारात्मक वातावरणात नजाफ येथे ही बैठक झाली. सिस्तानी यांनी उभे राहून फ्रान्सिस यांचे स्वागत केले. नंतर ते एकमेकांजवळ बसले. पोप यांनी अनेक लोकांची आधी भेट घेतली होती पण पोप यांनी लस घेतलेली आहे तर सिस्तानी यांनी लस घेतलेली नाही. पोप यांनी त्यांचे बूट सिस्तानी यांच्या खोलीजवळच काढले. सिस्तानीच बराच काळ बोलत होते. फ्रान्सिस यांना चहा देण्यात आला व प्लास्टिक बाटलीतून पाणी देण्यात आले. पोप यांनी केवळ जलपान केले. जाताना क्षणभर पोप फ्रान्सिस थबकले व त्यांनी सिस्तानी यांची खोली पुन्हा निरखून बघितली.

ख्रिस्ती समुदायाच्या सुरक्षिततेची ग्वाही

उर हे अब्राहमचे जन्मस्थान असून ख्रिश्चन, मुस्लिम व ज्यू सगळ्याच धर्माचे लोक अब्राहम यांना मानतात. ख्रिश्चन इराकींसारखेच शांतता व सुरक्षेत राहतील. त्यांना सर्व घटनात्मक अधिकार मिळतील अशी ग्वाही सिस्तानी यांनी नंतर जारी केलेल्या निवेदनातून दिली आहे.