कर्नाटकमधील काही घरांमध्ये काँग्रेसला प्रवेशबंदी करण्यात आली आहे. हे हिंदूचं घर आहे, काँग्रेसला येण्यास मनाई आहे…असं लिहिलेली पोस्टर्सच घरांबाहेर चिकटवण्यात आलेली आहेत. मंगळुरुमधील बंटवाल विधानसभा मतदारसंघात हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. ‘हे हिंदूचं घर आहे. काँग्रेसवाल्यांनो ज्यांनी ज्ञानश्रीच्या धर्मपरिवर्तनासाठी मदत केली, त्यांना येथे येण्यास परवानगी नाही. आमच्या घरातही मुली आहेत’, असं या पोस्टरवर लिहिण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीधर शेट्टी यांची मुलगी ज्ञानश्री हिचं एका दुसऱ्या धर्मातील मुलासोबत प्रेमसंबंध होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये ती त्याच्यासोबत पळून गेली होती. यानंतर ज्ञानश्रीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यावेळी ज्ञानश्री २१ वर्षांची होती. ज्ञानश्रीचा साखरपुडा ठरला असल्या कारणाने तिच्या आई-वडिलांना प्रचंड लाजिरवण्या प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. एका स्थानिकाने दिलेल्या माहितीनुसार, ‘गावातील काही लोकांना यामागे काँग्रेसच्या काही नेत्यांचा हात असल्याचा संशय आहे. ही मोहीम राबवण्यासाठी ते एका संधीच्या शोधात होते’.

हे पोस्टर गावातील जवळपास २० घरांबाहेर लावण्यात आलं आहे. आम्ही काँग्रेसला धडा शिकवणार असल्याचं एका व्यक्तीने सांगितलं आहे. केरळमध्ये अशाच प्रकारची एक मोहिम राबवण्यात आली होती. कठुआ बलात्कार आणि हत्येचा निषेध करत भाजपा नेत्यांना घरापासून लांब राहण्यास सांगण्यात आलं होतं.

कर्नाटक निवडणुकीत सध्या हिंदू-मुस्लिम मुद्दा चांगलाच गाजत आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंदिरात जाऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री सिद्धरमय्या यांनी अमित शहांच्या धर्मावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं.