प्रतिजैविकांना दाद न देणारे जीवाणू आता तयार झाल्याने प्रतिजैविकांवर (अँटीबायोटिक्स) मर्यादा आल्या आहेत. किरकोळ आजारांवर मोठ्या प्रमाणावर प्रतिजैविके वापरल्याने ही वेळ आली असतानाच आता वैज्ञानिकांनी प्रतिजैविकाला पर्यायी औषधे शोधून काढली आहेत. औषधांना न जुमानणाऱ्या जीवाणूंचा मुकाबला करण्याची ताकद त्यांच्यात आहे.
रूग्णांवर करण्यात आलेल्या छोट्याशा चाचणीत असे दिसून आले की, मेथिसिलीन या शक्तिशाली प्रतिजैविकालाही पुरून उरणाऱ्या स्टॅफीलोकॉकस ऑरियस या जीवाणूंना मारणारे औषध तयार करता आले आहे. स्टॅफीलोकॉकस ऑरियस हे महाजीवाणू म्हणून ओळखले जातात.
संशोधकांच्या मते नवीन उपचारांमध्ये जीवाणूंना प्रतिकार करणे अशक्य होणार आहे. त्वचेच्या संसर्गावर क्रीमच्या स्वरूपात ही औषधे आता उपलब्ध आहेत, पण त्यांचा वापर गोळ्या किंवा इंजेक्शनच्या माध्यमातून करणे येत्या पाच वर्षांत शक्य होणार आहे.
नवीन उपचारांमध्ये प्रतिजैविकांना दाद न देणाऱ्या जीवाणूंचा बंदोबस्त करण्यात आला आहे, असे ‘मायसेरॉस’ या जैवतंत्रज्ञान कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क ऑफरहॉस यांनी सांगितले.या उपचारपद्धतीत जीवाणूंच्या संसर्गावर वेगळ्या पद्धतीने हल्ला चढवला जातो, पारंपरिक औषधात मात्र तसे होते नाही. एमआरएसए या रोगाला कारणीभूत ठरणाऱ्या स्टॅफिलोकॉकस या जीवाणूला यात लक्ष्य केले जाते, पण उपकारक जीवाणू मात्र मारले जात नाहीत. निसर्गात असे विषाणू असतात की, जीवाणूंना त्यांच्यातील एंडोलायसिन या विकरांच्या मदतीने मारतात. त्याचीच नक्कल यात केली असून त्यात विशिष्ट रासायनिक रचना असलेले एंडोलासिन व स्टॅफेफेक्ट वैज्ञानिकांनी तयार केले आहे,
एंडोलायसिन कशी असतात
एंडोलायसिन ही निसर्गात असतात, पण औषधे तयार करताना त्यात सुधारणा कराव्या लागतात. त्यामुळे ते जीवाणूंना जाऊन चिकटतात व त्यांना चक्क फाडून टाकतात, असे वैद्यकीय सूक्ष्मजीव वैज्ञानिक बिजॉर्न हेरपर्स यांनी सांगितले. त्यांनी नेदरलँड्समध्ये सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत याबाबत प्रयोग केले आहेत.