केंद्रीय मंत्री जावडेकर यांचे प्रत्युत्तर

नवी दिल्ली : केंद्रातील मनमोहन सिंग सरकार सत्तेवर पायउतार झाले तेव्हा देशाची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती आता ती पाचव्या स्थानावर आलेली आहे आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्यासाठी आगेकूच करत आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेच्या हाताळणीबाबत केलेली टीका मान्य करता येणार नाही, अशी प्रतिक्रिया केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी दिली.

देशाच्या आर्थिक विकासाची गती जेमतेम पाच टक्क्य़ांवर आली आहे. गेल्या सहा वर्षांतील नीचांकी विकास दराची नोंद झाली आहे. अर्थव्यवस्थेची ही घसरण ‘मानवनिर्मित’ असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली होती. केंद्रातील मोदी सरकारला अर्थव्यवस्थेची हाताळणी योग्यपद्धतीने करता आली नाही. केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम झाला, असे ताशेरे सिंग यांनी ‘मानवनिर्मित’ असा शब्दप्रयोगाद्वारे केला. सिंग यांच्या दहा वर्षांंच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेची गती सुमारे आठ टक्के राहिली होती. पी. चिदम्बरम यांना कथित आर्थिक घोटाळ्यात झालेल्या अटकेचा अप्रत्यक्ष संदर्भ देत सिंग यांनी मोदी सरकारला ‘बदल्याचे राजकारण’ न करता अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ठोस निर्णय घेण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता.

सिंग यांच्या टीकेवर प्रत्युत्तर देताना जावडेकर म्हणाले की, केंद्र सरकार आर्थिक विकासाचा तात्पुरता नव्हे तर सर्वंकष विचार करत आहे. आर्थिक समस्यांवर मात करण्यासाठी जबाबदारीने निर्णय घेतले जात आहेत. ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीतील अडचणीही दूर केल्या जात आहेत. जीएसटी कौन्सिलची बैठक दरमहा होत असून उपयुक्त निर्णय घेतले जात आहेत.