जनता दल युनायटेडचे (जदयू) उपाध्यक्ष आणि प्रसिध्द राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नुकतीच मुंबईत शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी पंतप्रधानपदासाठी नितीश कुमारांना पाठींबा द्यावा, अशी मागणी त्यांनी उद्धव ठाकरेंकडे केली होती, असा दावा इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तामध्ये करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या खासदारांच्या विशेष बैठकीत प्रशांत किशोर यांनी मार्गदर्शन केले होते. दरम्यान, मातोश्रीवर त्यांची उद्धव ठाकरेंसोबत बैठकही पार पडली होती. युतीसाठी मध्यस्थी तसेच शिवसेनेच्या प्रचार रणनीतीबाबत या बैठकीत चर्चा झाल्याचे वृत्त बहुतेक माध्यमांनी दिले होते. मात्र, याला शिवसेनेकडून कुठलाही दुजोरा देण्यात आला नव्हता. मात्र, प्रशांत किशोर हे जदयूचे सदस्य उपाध्यक्षही आहेत. त्यामुळेच त्यांनी आपल्या पक्षाचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी लॉबिंग केल्याचा दावा इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तातून करण्यात आला आहे.

या वृत्तानुसार, प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्रामुख्याने आगामी निवडणुकांनंतर संभाव्य स्थिती काय असू शकते याबाबत चर्चा केली. तसेच भाजपाप्रणीत एनडीएला जर पूर्ण बहुमत मिळालं नाही तर पंतप्रधानपदासाठी नितीश कुमारांच्या नावाचा विचार करता येऊ शकतो, असे त्यांनी सांगितले. असे झाल्यास ज्यांना काँग्रेसचे सरकार नको आणि सत्तेत मोदीही नकोत अशा एनडीएत सामिल नसलेल्या पक्षांचा पाठींबा मिळवता येऊ शकेल असे त्यांनी म्हटले होते.

किशोर यांच्या म्हणण्याप्रमाणे, अशा एनडीएत नसलेल्या पक्षांचे १०० खासदार जिंकून येऊ शकतात. यासाठी त्यांनी शिवसेनेसह, वायएसआर काँग्रेस, तेलंगाणा राष्ट्र समिती, बिजू जनता दल आणि अद्रमुक या प्रादेशिक पक्षांचे उदाहरण दिले. नितीश कुमार यांना दर पंतप्रधानपदासाठी पुढे केले तर हे पक्ष एनडीएला पाठींबा देऊ शकतात असे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे गेल्यावर्षी राज्यसभेच्या उपसभापतीपदासाठी जदयूच्या उमेदवाराला बिजू जनता दलाने पाठींबा दर्शवला होता.