अयोध्येत राम मंदिर आणि देशात रामराज्य निर्माण करणे हेच लक्ष्य असल्याचे मत विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय सचिव प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केले. हैदराबाद येथे आयोजित शोभा यात्रेच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. या वेळी त्यांनी मुस्लिमांच्या लांगुलचालनावर व त्यांना देण्यात येत असलेल्या सवलतींवर टीका केली. मुघल साम्राज्याचा संस्थापक झहीरूद्दीन बाबर याचा भारताशी काहीही संबंध नसून ते मंगोलियाचे असल्याचे सांगत, देशात त्यांचे स्मारक उभारण्याची गरज नसल्याचे त्यांनी म्हटले.

ते म्हणाले, अयोध्येतच भगवान रामांचा जन्म झाला आहे. त्यामुळे अयोध्येत मशीद उभारण्यास आपला विरोध असून यासाठी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जगातील कोणतीही शक्ती अयोध्येत राम मंदिर उभारण्यापासून रोखू शकणार नाही, असे ठामपणे त्यांनी सांगितले. मागील ७० वर्षांत एकाही सरकारने राममंदिर उभारण्यासाठी किंवा देशात रामराज्य निर्मितीसाठी प्रयत्न केले नाहीत. देशातील ९५ लाख मुस्लिम विद्यार्थ्यांना सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. तर दुसरीकडे ६ कोटी हिंदू विद्यार्थी अशा मदतीपासून वंचित आहेत. हे सरकारच्या दुर्लक्षामुळे झाले असून तब्बल १५ कोटींहून अधिक हिंदू युवक बरोजगार आहेत. त्यांना नोकरी देण्यास सरकार असमर्थ ठरले असल्याचा त्यांनी आरोप केल्याचे वृत्त सियासत.कॉम या वेबसाइटने दिले आहे.
ही शोभा यात्रात शहरातील सीताराम बाग मंदिरापासून निघाली. या वेळी भाजपचे आमदार राजासिंग हेही उपस्थित होते. शहरातील प्रमूख मार्गावरून ही शोभा यात्रा काढण्यात आली. बेगमबाजार येथे शोभा यात्रा पोहोचल्यानंतर राजा सिंग यांनी भाषण केले. मुल्लांचे राज्य संपुष्टात आले असून आता योगी सरकार अस्तित्वात आल्याचे ते म्हणाले.
वृंदावन येथून आलेले ब्रिजमोहन महाराज हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी मुसलमानांना देण्यात आलेल्या १२ टक्के आरक्षणाला विरोध केला. ‘व्होट बँके’ साठी सरकार असे निर्णय घेत असल्याची टीका त्यांनी केली. मुस्लिमांना अमिषे दाखवून आतापर्यंत मते मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण उत्तर प्रदेशच्या निकालांनी अशांना उत्तर दिल्याचे ते म्हणाले. या वेळी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावरही टीका केली. पुढील निवडणुकीत त्यांचा पराभव निश्चित असल्याचे ते म्हणाले.