जद(यू)चे ज्येष्ठ नेते नितीशकुमार हे शुक्रवारी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह अनेक महत्त्वाचे नेते या शपथविधीला उपस्थित राहणार असल्याने कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे.
दुपारी २ वाजता पाटणा येथील गांधी मैदानात नितीशकुमार हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, असे पाटण्याचे विभागीय आयुक्त आनंद किशोर यांनी सांगितले. अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार असल्याने दोन हजार सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले.
अतिमहत्त्वाच्या व्यक्ती आणि विशेष संरक्षण असलेल्या व्यक्तींसाठी छताच्या आकाराची दोन व्यासपीठे उभारण्यात आली आहेत, तर मुख्य व्यासपीठावर नितीशकुमार आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी यांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर शेजारीच उभारण्यात आलेल्या व्यासपीठावर नवनिर्वाचित आमदारांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
पाटण्याचे ज्येष्ठ पोलीस अधीक्षक विकास वैभव यांनी विमानतळ ते गांधी मैदान या मार्गावरील सुरक्षेची गुरुवारी पाहणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीशकुमार यांचे निमंत्रण स्वीकारले आहे, मात्र पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे ते शपथविधीला उपस्थित राहू शकणार नाहीत.

शत्रुघ्न सिन्हांची गैरहजेरी
जद(यू)चे नेते नितीशकुमार यांच्याकडून आपल्याला शपथविधी समारंभाचे निमंत्रण मिळाले आहे, मात्र पूर्वनियोजित वैयक्तिक कार्यक्रमामुळे आपण या समारंभाला उपस्थित राहू शकणार नाही, असे भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. शत्रुघ्न सिन्हा सध्या जगन्नाथपुरी येथे पत्नी पूनम यांच्यासमवेत दर्शनासाठी गेले आहेत.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री?
राजदचे नेते लालूप्रसाद यादव यांच्या तेजस्वी आणि तेजप्रताप या दोन्ही पुत्रांची बिहार मंत्रिमंडळात वर्णी लागणार असल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी एका संकेतस्थळाला दिली आहे. इतकेच नव्हे तर तेजस्वी यादव यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. लालूप्रसाद यादव यांचे जुने सहकारी अब्दुल बारी सिद्दिकी यांच्याकडे अर्थमंत्रीपद देण्यात येणार आहे, असेही सूत्रांनी सांगितले.