निवडणूक आयुक्त सुनील अरोरा देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त असतील. विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त ओ पी रावत यांचे स्थान ते घेतील. निवडणूक आयोगाने सोमवारी या नियुक्तीला पुष्टी दिली. येत्या २ डिसेंबरला अरोरा हे पदभार स्वीकारतील. रावत यांचा कार्यकाळ १ डिसेंबर रोजी संपुष्टात येणार आहे.

अरोरा हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (आयएएस) १९८० च्या तुकीडीचे राजस्थान केडरचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. ३१ ऑगस्ट २०१७ रोजी त्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली होती. विधी मंत्रालयाने सोमवारी अरोरा यांच्या नियुक्तीला सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर परवानगीसाठी तो राष्ट्रपती भवनात पाठवण्यात आला आहे. अरोरा यांच्या नियुक्तीच्या औपचारिक घोषणेची अधिसूचना लवकर काढण्यात येईल, असे मंत्रालयातील सूत्राने माहिती दिली.

राजस्थानमध्ये प्रशासकीय सेवेत असताना ६२ वर्षीय अरोरा यांनी विविध विभागाचे कामकाज पाहिले आहे. त्याचबरोबर ते केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण विभागाचे सचिव आणि कौशल विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे सचिव म्हणूनही काम पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी अर्थ आणि वस्त्रोद्योग आणि योजना आयोगाच्या विविध पदांवर काम केले आहे. ते १९९३ ते १९९८ पर्यंत राजस्थानच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे सचिव आणि २००५ ते २००८ पर्यंत मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव म्हणून काम केले आहे.