दक्षिण आफ्रिकेतील जंगलामध्ये गेंड्यांची शिकार करण्यासाठी गेलेल्या शिकऱ्यांचीच सिंहांने शिकार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सहा सिहांच्या कळपाने कमीत कमी तीन शिकाऱ्यांना जिवंत खालल्याची शक्यता या खाजगी अभयारण्याच्या मालकांनी व्यक्त केली आहे.

दक्षिण आफ्रिकेतील सिबूया गेम रिझर्व्हमध्ये (अभयारण्य) हा धक्कादायक प्रकार घडला. अभयारण्य व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीच्या सुमारास काही शिकारी गेंड्यांची शिकार करण्याच्या उद्देशाने अभयारण्यामध्ये शिरले. या शिकऱ्यांनी आपल्याबरोबर मोठ्या आवाज न करणाऱ्या रायफल्स, कुऱ्हाडी, वायर कटर्स आणि अनेक दिवस पुरले इतके खाद्य पदार्थ आणले होते. हा सर्व प्रकार दोन जुलैच्या मध्यरात्री घडल्याचे अभयारण्याचे ६० वर्षीय मालक निक फॉक्स यांनी सांगितले.

दोन तारखेच्या पहाटे शिकाऱ्यांना ओळखण्यासाठी पाळलेली कुत्री अचानक भुंकू लागल्याने अभयारण्यात शिकारी शिरल्याची शक्यता आम्हाला वाटली. मात्र त्याच वेळेस सिंहाच्या डरकाळीचा जोरात आवाज आल्याने सिंहाने केलेल्या शिकारीमुळे कुत्री भुंकली असल्यासारखे आम्हाला वाटल्याचे फॉक्स यांनी सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी साडेचारच्या सुमारास रोज देखरेखीसाठी सिंहाच्या परिसरात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेथे मानवी शरिराचे काही तुकडे दिसले. त्यांनी लगेच मला तिथे बोलवून घेतले. आम्ही ज्यावेळी तिथे पोहचलो तेव्हा तिथे शिकारीची हत्यारे पडलेली दिसली. ज्यामध्ये रायफल्स, वायर कटर, हातमोजे, कुऱ्हाडींचा सावेश होता. याचबरोबर खाद्यपदार्थांने भरलेल्या बँग आणि पाण्याच्या बाटल्याही आम्हाला अढळून आल्याचे फॉक्स यांनी सांगितले. आम्ही लगेच या घटनेची माहिती शिकारप्रतिबंधक पोलिसांच्या तुकडीला दिली.

प्राथमिक शक्यतेनुसार गेंड्यांची शिकार करायला आलेल्या शिकाऱ्यांचा अंदाज चुकल्याने ते गेंड्यांच्या परिसराकडे जाण्याऐवजी सहा सिंह असणाऱ्या परिसरात शिरले असावेत. त्यातच अंधार असल्याने सिंहांनी त्यांच्यावर हल्ला केल्याने त्यावेळी त्यांना पळून जाण्याची संधीही मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी या परिसरामध्ये अभयारण्याच्या कर्मचाऱ्यांना तीन बुटांचे जोडे सापडले. त्यावरून कमीत कमी तीन शिकऱ्यांना या सिंहाने खाल्ल्याची शक्यता आहे. आणखीन शिकारी या परिसरामध्ये लपून बसले आहेत का हे पाहण्यासाठी फॉक्स यांनी खास हॅलिकॉप्टरही मागवले होते.

या संदर्भात व्यवस्थापनाने आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्टही केली आहे.

दक्षिण आफ्रिकेमध्ये गेंड्यांची शिकार केल्यास तुरुंगावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. तरीही मागील वर्षी हजारहून अधिक गेंड्यांची शिकार केली गेली. मोठ्या अभयारण्यांमध्ये शिकार प्रतिबंधक उपाययोजना मोठ्या प्रमाणात सुरु कऱण्यात आल्याने शिकाऱ्यांनी लहान अभयारण्यांकडे आपला मोर्चा वळवला आहे. सिबूया अभयारण्यात सिंहांनी ज्यांच्या फडशा पाडला ते अशाच काही शिकाऱ्यांच्या टोळीतील लोकं असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

माणसाच्या मांसाची चटक?

अशाप्रकारे शिकाऱ्यांचा फडशा पाडण्याचा हा काही पहिलाच प्रकार नाही. याआधीही आफ्रिकेच्या जंगलामध्ये सिहांनी माणसांवर प्राणघातक हल्ले केले आहेत. त्यातही लायन सफारी लोकप्रिय असणाऱ्या सिबूया सारख्या अभयारण्यातही हे प्रकार घडल्याने लायन सफारीसाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या जीवाला धोका तर नाही ना असा प्रश्न आता स्थानिक प्रसारमाध्यमांकडून उपस्थित केला जात आहे. मात्र पर्यटकांच्या जीवाला कोणताही धोका नसून त्यांची सुरक्षा ही आमची जबाबदारी असल्याचे फॉक्स यांनी या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले आहे.