पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तीन देशांच्या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात शनिवारी सौदी अरेबियामध्ये आगमन झाले. त्यांच्या दोन दिवसांच्या या दौऱ्यात दोन्ही देश आपली सामरिक भागीदारी वाढवण्यासाठी अनेक करार करणार असून सुरक्षाविषयक व दहशतवादविरोधी सहकार्य अधिक बळकट करण्याची अपेक्षा आहे.
खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील ‘रॉयल टर्मिनल’ वर शाही कुटुंबांचे प्रमुख सदस्य व रियाधचे गव्हर्नर राजपुत्र फैजल बिन बंदर बिन अब्दुलअझीझ यांनी देशाच्या अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसह त्यांचे स्वागत केले.
रियाधपासून ३५ किलोमीटर अंतरावरील विमानतळावरून पंतप्रधान थेट भव्य आणि कडक सुरक्षा व्यवस्था असलेल्या किंग सौद अतिथिगृहाकडे रवाना झाले. सौदीचे राजे सलमान बिन अब्दुलअझीझ अल-सौद यांनी मोदींसह भारतीय प्रतिनिधींची येथे व्यवस्था केली आहे.
‘सौदी अरेबियाला पोहचलो. ही भेट फलदायी ठरेल आणि यातून आमचे द्विपक्षीय संबंध बळकट होतील अशी मला आशा आहे’, असे आगमनानंतर लगेच मोदी यांनी अरबी व इंग्रजीत ट्विट केले.
गेल्या सात महिन्यांत मोदी यांची आखाताला ही दुसरी भेट आहे. ८० लाखांहून अधिक भारतीय लोक वास्तव्याला असलेला हा भाग भारताच्या ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.
दहशतवाद आणि कट्टरतावाद यांच्या धोक्याचा मुकाबला करणे हा मोदी आणि सौदीच्या नेतृत्वामधील बोलण्यांचा प्रमुख अ‍ॅजेंडा राहील अशी अपेक्षा आहे.