पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी विजयादशमी निमित्त दिल्लीतील द्वारका येथील रामलीला मैदानावर आयोजित रावण दहन कार्यक्रमास उपस्थिती लावली होती. यावेळी मोदी यांच्या हस्ते १०७ फुटी रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. कार्यक्रमास दिल्ली भाजपाचे अध्यक्ष मनोज तिवारी यांच्यासह भाजपा नेत्यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी कार्यक्रमास जमलेल्या हजारो नागिरकांना संबोधित देखील केले. ‘जय श्रीराम’ अशी घोषणा देत मोदी यांनी भाषणाची सुरूवात केली व म्हणाले की, भारत म्हणजे उत्सवांची भूमी आहे. भारतात प्रत्येक दिवशी उत्सव असतो. वर्षभरात कदाचित एखादा दिवस असेल त्या दिवशी आपण उत्सव साजरा करत नाही. उत्सव आपल्याला जोडतात आपल्यात उत्साह निर्माण करतात, हे आपल्या नसानसांत भिनलेले आहेत. ते आपल्या संस्कार, शिक्षण व सामाजिक जीवनाचे घटक आहेत.

यावेळी मोदी म्हणाले की, उत्सव आपल्या सामाजिक जीवनासाठी प्राण तत्त्व आहे.  आईचा, मुलीचा सन्मान, गौरव आणि तिची प्रतिष्ठा जपण्याचे, तिचे संरक्षण करण्यासाठी संकल्प करणे ही आपली जबाबदारी आहे. यंदाच्या दिवाळीत सामूदायिक कार्यक्रमाचे आयोजन करून ज्या मुलींनी जीवनात काही मिळवले आहे, ज्यांच्याद्वारे इतरांना प्रेरणा मिळते त्यांचा सन्मान केला जावा. या दिवाळीत हेच आपले लक्ष्मीपूजन असायला हवे.

आज विजयादशमीचा मुहूर्त आहे व याबरोबर आपल्या हवाई दलाचा देखील जन्मदिवस आहे, असे म्हणत त्यांनी या निमित्त आपण आपल्या हवाई दलाच्या जवानांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करू असे उपस्थितांना आवाहन केले.  तसेच, आम्ही आव्हान देणारे देखील आहोत आणि वेळेनुसार स्वतःला बदलणारे देखील असल्याचे मोदी यांनी यावेळी सांगितले.  याबरोबरच  त्यांनी नागिरकांना आपण अन्न वाया न घालवणे, वीज व पाण्याची बचत करण्याचा निश्चिय करायला हवा, असेही म्हटले.