आम्ही जगाला युद्ध नाही तर बुद्ध दिला आहे, जगाला शांततेचा संदेश दिला आहे. यामुळेच आमच्या आवाजात दहशतवादाविरोधात जगाला सावध करण्याचे गांभीर्य आहे. याचबरोबर दहशतवादाविरोधातला संताप देखील आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या ७४ व्या सत्रात ते  बोलत होते.

दहशतवाद कोणत्याही एकाच देशासमोरीलच नाही तर संपूर्ण जग व मानवजातीसमोरचे आव्हान आहे. दहशतवादाविरोधात संपूर्ण जगाने एक होण्याची गरज आहे, असेही मोदींनी सांगितले.

यावेळी मोदी म्हणाले की, भारत हजारो वर्षांपूर्वीची एक महान संस्कृती आहे, ज्याची स्वतःची एक विशिष्ट परंपरा आहे. जो जागितक स्वप्न बाळगून आहे. लोकांच्या सहभागातून लोकांचे कल्याण हे आमचे मुळ तत्व आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या सत्रात बोलणे हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण आहे. आजचा हा क्षण यासाठी देखील महत्वाचा आहे कारण, यावर्षी संपूर्ण जग महात्मा गांधी यांची १५० वी जयंती साजरी करत आहे. सत्य आणि अहिंसेचा त्यांनी दिलेला संदेश आजही जगासाठी मार्गदर्शक ठरत आहे.

तसेच, पंतप्रधान मोदींनी यावेळी सांगितले की, यावर्षी जगातील सर्वात मोठी निवडणूक झाली. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राष्ट्रातील जनतेने सर्वाधिक मत देऊन मला व माझ्या सरकारला पहिल्यापेक्षा जास्त जनादेश दिला. जगातील सर्वात मोठे स्वच्छता अभियान भारतात पार पडले. केवळ पाच वर्षांमध्ये जनतेसाठी ११ कोटींपेक्षा जास्त स्वच्छतागृह तयार करून, एका विकसनशील देशाने जगाला स्वच्छतेचा संदेश दिला. २०२० पर्यंत आम्ही गरिबांसाठी आणखी दोन कोटी घरांची व्यवस्था करणार असल्याचे सांगत, २०२५ पर्यंत भारतला टीबी मुक्त करण्यासाठी काम करत असल्याचेही मोदींनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण संपताच त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.   मोदी यांच्या भाषणानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे भाषण होणार आहे. संयुक्त राष्ट्राच्या महासभेत  मोदी यांनी चौथ्या नंबरवर येऊन जगाला संबोधित केले.

या अगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इराणचे राष्ट्रपती हसन रूहानी यांच्यात गुरूवारी बैठक पार पडली होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चाबहार बंदर आणि त्याचे महत्व यावर चर्चा झाली. याशिवाय दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय संबंधावरही चर्चा झाली.