Kerala Floods :  धुंवाधार बरसणारा पाऊस आणि नद्यांना आलेला पूर यामुळे केरळमध्ये सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जवळजवळ संपूर्ण केरळमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. या पुरात ३२४ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे २ लाख नागरिक बेघर झाले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शनिवारी  मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्यासोबत पूरग्रस्त भागाची हवाई पाहणी केली.  परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर पूरातील मृतांच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये तर, गंभीर जखमींना ५० हजार रुपयांच्या आर्थिक मदतीची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली. याशिवाय मोदी यांनी परिस्थितीवर मात करण्यासाठी केरळला ५०० कोटी रूपयांची मदत जाहिर केली आहे. याआधी राजनाथसिंह यांनी केरळला १०० कोटींची मदत जाहिर केली होती.

केरळमध्ये आलेला महापूर हा १०० वर्षांतील सर्वांत भयानक महापूर असल्यानेच नमूद करत पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आले आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी नुकतीच केरळमधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी १० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली. तत्पूर्वी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केरळसाठी १० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा केली असून ५ कोटींचा निधी मुख्यमंत्री मदत निधीसाठी तर उर्वरित ५ कोटी रुपये अन्न आणि आवश्यक वस्तूंच्या रुपात पाठवले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. दिल्ली सरकारकडून १० कोटी, तेलंगणाकडून २५ कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केरळमधील पुरग्रस्तांसाठी देण्यात आले आहे.

वाचा – Kerala floods : इतर राज्यांची केरळच्या मदतीसाठी धाव; निधीसह अन्न आणि वस्तूंचा पुरवठा

केरळमधील सामान्य जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. राज्यातील अनेक भाग पाण्याखाली आहेत. रस्ते बंद झाले असून रेल्वे आणि हवाई सेवेलाही फटका बसला आहे. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडयांचे मार्ग वळवण्यात आले आहेत. कोची विमानतळ बंद आहे. लष्कर, नौदल आणि हवाई दलाकडून दिवसरात्र बचावमोहिम सुरु आहे.

वाचा – Kerala Floods: केरळमध्ये एका दिवसात १०६ जणांचा मृत्यू, पंतप्रधान आज पाहणी करणार

केरळमध्ये १४ पैकी १३ जिल्ह्यांमध्ये पूरानं गेले आठ दिवस थैमान घातलं असून देशभरातून मदतीचा हात पुढे येत आहे. आत्तापर्यंत आठ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे तर लाखाच्या पुढे लोक बेघर झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळमध्ये दाखल झाले असून त्यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन यांना सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे.

वाचा – Kerala Floods: केरळमध्ये १०० वर्षातील सर्वात भीषण पूर, ८२ हजार लोकांना वाचवले, ३२४ जणांचा मृत्यू

पुण्यातून केरळसाठी सात लाख लिटर पिण्याचे पाणी ट्रेनने पाठवले जाणार आहे. पूरग्रस्त परिस्थितीमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. पिण्याचे पाणी नागरिकांना उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने पुण्यातून रेल्वेद्वारे पाणी पोहोचविले जाणार आहे. तसेच गुजरातमधील रतलाम येथून १४ लाख ५० हजार लिटर पाण्याचे वॅगन पुण्यात येणार आहे. असे एकूण २१ लाख ५० हजार लिटर पिण्याचे पाणी पुण्यातून केरळला होणार आहे.  पुण्यातील घोरपडी कोचिंग कॉम्प्लेक्स येथे पाणी भरण्यात येत आहे. रतलामहून पाणी पुण्यात पोहचल्यानंतर आज शनिवारी दुपारी एक नंतर पाण्याच्या गाड्या केरळसाठी रवाना होणार आहेत.

वाचा :  VIDEO : गर्भवती महिलेला नेव्हीने वाचवले, बाळ-बाळंतीण सुखरूप

दरम्यान, केरळमधील अलाप्पुझा, एर्नाकुलम, पथनमतित्ता आणि त्रिशूर या जिल्ह्यांतील पूरस्थिती अत्यंत भयानक आहे. पंपा, पेरियार आणि चालाकुडी नद्यांनी पाणीपातळी ओलांडली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. केरळच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून महापुरासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.