यमुनानगर (हरयाणा) : येथील एका शाळेत १२वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आपल्याच शाळेच्या मुख्याध्यापकांवर गोळीबार केल्याचा थरारक प्रकार घडला आहे. या गोळीबारात हल्लेखोर विद्यार्थ्याने तीन गोळ्या झाडल्यामुळे महिला मुख्याध्यापकाचा मृत्यू झाला आहे. यामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण असून संबंधीत विद्यार्थ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अधिक माहिती मिळू शकलेली नाही.


पोलिसांच्या माहितीनुसार, हरयाणाच्या यमुनानगरमधील विवेकानंद शाळेत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या शाळेतील १२वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने थेट मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये घुसून त्यांच्यावर जवळून तीन गोळ्या झाडल्या. यामध्ये त्या गंभीररित्या जखमी झाल्या, त्यानंतर त्यांना उचारासांठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, उपचरांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र, असे कृत्य या विद्यार्थ्याने का केले याबाबत अद्याप माहिती कळू शकलेली नाही.

दरम्यान, घटनेची माहिती कळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थली भेट दिली. संबंधित विद्यार्थ्याने आपल्या वडिलांच्या मालकीच्या लायसन्स असलेल्या पिस्तुलातून या गोळ्या झाडल्याने पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी हे पिस्तुलही ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरु असल्याचे यमुनानगरचे जिल्हा पोलीस आधीक्षक राजेश कालिया यांनी सांगितले.