आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्या अधिक वृद्धिंगत करून विकसनशील जगात लाखो रोजगार निर्माण केले जातील असे ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या कॅबिनेट मंत्री प्रीती पटेल यांनी सांगितले. वरिष्ठ मंत्री या नात्याने त्यांनी सांगितले की, मी माझ्या कारकीर्दीत जास्तीत जास्त रोजगार निर्माण करीन. पंतप्रधान थेरेसा मे यांच्या मंत्रिमंडळात प्रीती पटेल यांना आंतरराष्ट्रीय विकास मंत्री करण्यात आले आहे. दारिद्रय़, रोग व स्थलांतर अशा अनेक समस्या आहेत त्यावर मी मात करीन, त्याशिवाय विकसनशील जगातही लाखो रोजगार निर्माण करण्याचा प्रयत्न करीन, व्यापारासाठी भागीदार देश निवडले जातील व त्यातून ही रोजगार निर्मिती होईल, असे त्यांनी सांगितले. व्हाइट हॉल येथे त्यांनी मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच निवेदन केले. ब्रेग्झिटच्या समर्थक असलेल्या प्रीती पटेल यांनी सांगितले की, युरोपीय महासंघातून यशस्वीपणे बाहेर पडल्यानंतर आता ब्रिटनला बाहेरच्या जगाकडे आणखी खुलेपणाने बघावे लागेल, आंतरराष्ट्रीय भागीदाऱ्या  निर्माण करून आर्थिक भरभराट, स्थिरता व सुरक्षा निर्माण करावी लागेल.