हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या या प्रकरणी काँग्रेसच्या सरचिटणीस यांनी पीडितेच्या कुटुंबीयांच्या वतीने पाच प्रश्न मोदी सरकारला केले आहेत. हाथरसमध्ये घडलेल्या बलात्काराच्या घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारवर प्रचंड टीका होते आहे. तसेच भाजपावर टीका होते आहे.

काय आहेत उपस्थित करण्यात आलेले प्रश्न

सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे

हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये

आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?

आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?

आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे प्रश्न मोदी सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत. उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीवर हल्लाही झाला तिची जीभ छाटण्यात आली. पीडित मुलीवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरला उशिरा या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून होतो आहे.

दरम्यान हाथरस या ठिकाणी प्रियंका आणि राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना सुरुवातीला भेटू दिलेलं नाही. तिथे राहुल गांधी यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या सगळ्या प्रकाराचा निषेध देशभरातून झाल्यानंतर तसंच या प्रकरणावरुन खूप टीका झाल्यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.