काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची सुरक्षाव्यवस्था भेदण्याचा प्रकार लोधी इस्टेट भागातील त्यांच्या घरात नुकताच घडला. सातजण एका मोटारीत बसून या घराच्या पोर्चपर्यंत गेले, तेथे खाली उतरले आणि प्रियंका यांना भेटून त्यांना छायाचित्र काढण्यासाठी विनंती केली, अशी माहिती सूत्रांनी दिली.

२६ नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेच्या संदर्भात प्रियंका यांच्या कार्यालयाने सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटीचा मुद्दा केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे (सीआरपीएफ) उपस्थित केला असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

ही मोटार प्रियंका यांच्या घरच्या बगिच्याजवळ असलेल्या पोर्चपर्यंत गेली आणि मोटारीतून ३ पुरुष, ३ महिला व एक मुलगी खाली उतरले. ते प्रियंका यांच्यापर्यंत चालत गेले आणि त्यांच्यासोबत छायाचित्र काढू देण्याची विनंती केली. प्रियंका त्यांच्यासोबत बोलल्या, त्या लोकांनी त्यांच्यासोबत छायाचित्रे काढली आणि मग ते निघून गेले, अशीही माहिती सूत्रांनी दिली. यानंतर त्यांच्या कार्यालयातील काही लोकांनी हा मुद्दा सीआरपीएफकडे मांडला.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या कुटुंबीयांना असलेली विशेष सुरक्षा गटाची (एसपीजी) सुरक्षा केंद्र सरकारने गेल्या महिन्यात काढून घेतली असून, त्यांना सीआरपीएफकरवी पुरवली जाणारी ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली आहे.