पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेमध्ये पाकिस्तानी वंशाच्या  नागरीकांना संबोधित करत असताना बलुचिस्तान समर्थकांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणले. अमेरिका दौऱ्यावर असलेले इम्रान खान यांनी वॉशिंग्टन डीसी एरीना वन येथे अमेरिकेत राहणाऱ्या पाकिस्तानी नागरीकांना संबोधित केले. इम्रान यांना ऐकण्यासाठी मोठया संख्येने पाकिस्तानी नागरीक जमले होते.

यावेळी बलुचिस्तान समर्थकांनी त्यांच्या भाषणात अडथळे आणले. बलुचिस्तानला न्याय देण्यासाठी घोषणाबाजी केली. प्रेक्षक गॅलरीत बसलेले बलुच समर्थक घोषणाबाजी करुन अडथळे आणत असतानाही इम्रान यांनी आपले भाषण चालू ठेवले. यावेळी सुरक्षा रक्षक गोंधळ घालणाऱ्यांना बाहेर निघण्यासाठी सांगत होते. बलुचिस्तानवरील अन्याय दूर करण्यासाठी वॉशिंग्टन डिसीमध्ये बलुच संघटनांनी मोबाइल बिलबोर्ड मोहीम सुरु केली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली आहे. ही मोहीम जागरुकता निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे असे जागतिक बलुच संघटनेने म्हटले आहे. बलुचिस्तानातील मानवी हक्कांचे उल्लंघन थांबवण्यासाठी जागतिक बलुच संघटनेने डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे मदत मागितली आहे.

विमानतळावरच इम्रान खान यांचा अपमान
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान मोठया अपेक्षेने अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. पण अमेरिकेने त्यांच्या दौऱ्याला फारसे महत्व दिले नसल्याचे दिसत आहे. इम्रान खान यांचे शनिवारी अमेरिकेत आगमन झाले. त्यावेळी विमानतळावर त्यांच्या स्वागतासाठी ट्रम्प प्रशासनातील कुठलाही मंत्री किंवा बडा अधिकारी उपस्थित नव्हता. अमेरिकेत दुसऱ्या देशाच्या प्रमुखाचे खास स्वागत करण्याची परंपरा आहे. पण विमानतळावर इम्रान यांचे जोरदार स्वागत करण्यात आले नाही.