मार्स ऑर्बिटर यानाने (मंगळयान) बुधवारी सकाळी यशस्वीपणे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केल्यामुळे भारतासाठी अंतराळ क्षेत्रातील नवी क्षितीजे खुली झाली आहेत. पहिल्याच प्रयत्नात मंगळावर यशस्वी स्वारी करणाऱ्या काही मोजक्या देशांच्या पंक्तीत भारताचा समावेश झाला आहे. जगातील विविध देशांनी आजपर्यंत मंगळावर ५१ मोहिमा आखल्या असून, त्यातील केवळ २१ यशस्वी झाल्या आहेत. मात्र, भारत पहिल्याच प्रयत्नात यशस्वी ठरल्यामुळे अंतराळ संशोधन क्षेत्रात देशाचे नाव उंचावले आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने हाती घेतलेल्या ‘मार्स ऑरबायटर’ या ४५० कोटींच्या प्रकल्पाची यानिमित्ताने यशस्वी सांगता झाली.  बुधवारी सकाळापासूनच मंगळयानाच्या यशस्वी प्रवासाची उलटगणती सुरू झाली. या प्रवासाचा घेतलेला संक्षिप्त आढावा
सकाळी ४.१७- मंगळयानाचा मिडीयम गेन एन्टेना कार्यान्वित
सकाळी ६.५६- मंगळयानाच्या रोटेशनला सुरूवात
सकाळी ७.१२- यानाचे एक्लिप्स सुरू करण्यात आले
सकाळी ७.१७- लिक्विड अ‍ॅपॉजी मोटर इंजिन प्रज्वलित करण्याच्या प्रक्रियेला सुरूवात
सकाळी ७.२१- इंजिन प्रज्वलित केल्यानंतर यानाचा सिग्नल दिसेनासा झाला
सकाळी ७.३०- लिक्विड अ‍ॅपॉजी मोटर इंजिन प्रज्वलित करण्यात यश
सकाळी ७.३७- यानाचे एक्लिप्स बंद करण्यात आले
सकाळी ७.४१- मंगळयानाची प्रज्वलन प्रक्रिया पूर्ण
सकाळी ७.४२- मंगळयानाच्या रिव्हर्स रोटेशनला
सकाळी ७.४५- मंगळयानाचा सिग्नल पुन्हा मिळण्यास सुरूवात
सकाळी ७.५२- यानाचा मंगळाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत प्रवेश

भारताचे मंगळयान (मार्स ऑरबायटर मिशन-मॉम) हे पीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या मदतीने श्रीहरिकोटा येथून मंगळाच्या दिशेने पाठवण्यात आले होते. ६६.६० कोटी कि.मी. अंतराच्या या प्रवासात मंगळयान १ डिसेंबर २०१३ रोजी पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून मुक्त झाले होते.