थावरचंद गेहलोत यांचे लोकसभेत स्पष्टीकरण

अनुसूचित जाती-जमाती आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) पदोन्नतीत आरक्षण देण्यास सरकार अनुकूल असल्याचे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्री थावरचंद गेहलोत यांनी सोमवारी लोकसभेत स्पष्ट केले. याबाबतच्या प्रस्तावाला वैैधानिक अधिष्ठान देण्यासाठी कायदा लागू करण्यापूर्वी सकारात्मक वातावरण तयार करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी काँग्रेसला केले.

सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्या मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेस नेते मल् िलाकार्जुन खरगे यांनी पदोन्नतीतील आरक्षणाचा मुद्दा मांडला. अनुसूचित जाती-जमाती आणि ओबीसींना पदोन्नतीत आरक्षण देण्याची लेखी भूमिका काँग्रेसने घेतली तर सरकार या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेईल, असे गेहलोत यांनी सांगितले. एनडीए आणि काँग्रेस यांच्यातील काही घटकांचा पदोन्नतीतील आरक्षणाला विरोध असल्याची कबुली गेहलोत यांनी दिली. एनडीए सरकारकडे बहुमत असल्याने याबाबतचे विधेयक मंजूर करावे, अशी मागणी खरगे यांनी केली. भाजप खासदारांनी आरक्षणाची गरज पंतप्रधानांना पटवून द्यावी, असा सल्लाही त्यांनी दिला.