येमेनची राजधानी सनामध्ये इराण पुरस्कृत हूती विद्रोह्यांनी लहान मुलींची हत्या करणाऱ्या वडिलांना भर चौकात जाहीर मृत्यूदंडाची शिक्षा दिलीय. राजधानी सनावर ताबा मिळवलेल्या या विद्रोह्यांनी तीन आरोपींना भर चौकात गोळ्या घालून ठार केल्याचं वृत्त एएफपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. आरोपींचा मृत्यू झाल्यानंतर एका चादरीत गुंडाळून त्यांचे मृतदेह चौकामधून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जाण्यात आले. ही मृत्यूदंडाची शिक्षा दिली जात असताना सुरक्षा दलातील जवान जमीनीवर पडलेल्या या आरोपींवर हसत होते. येमेनमध्ये २०१८ नंतर पहिल्यांदात अशाप्रकार जाहीरपणे तालिबानी पद्धतीने एखाद्या आरोपीला शिक्षा देण्यात आल्याचा प्रकार घडलाय.

विद्रोह्यांनी ज्या आरोपींना भरचौकामध्ये मृत्यूदंड दिला त्यामध्ये ४० वर्षाचे अली अल-नामी, ३८ वर्षीय अब्दुल्ला अल-मखली आणि ३३ वर्षीय मोहम्मद अरमान यांचा समावेश होता. हे तिघेही येमेनचे नागरिक होते. सना येथील तहरीर स्वेअर येथे या तिघांनाही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यासाठी घेऊन जाण्यात आलं तेव्हा त्यांना कैद्यांना घालण्यात येतात तसे निळ्या रंगाचे जम्पसूट घालण्यात आले होते. त्यानंतर या तिघांनाही चौकामध्ये एका चादरीवर हात बांधून तोंड जमीनीकडे करुन झोपवण्यात आलं आणि त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला.

शेकडो लोकांच्या समोर हिरव्या रंगातील वर्दीमधील सेनेच्या आणि काळे हातमोजे घातलेल्या जल्लादांनी तिघांच्याही पाठीवर एके-४७ रायफलने एकामागून एक गोळ्या चालवल्या. अगदी शरीराला बंदूक टेकवून गोळीबार केल्याने या तिघांचाही जागीच मृत्यू झाला. मेल्यानंतर या तिघांचे मृतदेह चादरीत गुंडाळून घेऊन जाण्यात आले.

यापूर्वी सनामध्ये ऑगस्ट २०१८ रोजी अशाप्रकारे सार्वजनिक पद्धतीने भरचौकात मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली होती. या तिन्ही आरोपींचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळ त्यांचे मृतदेह क्रेनच्या सहाय्याने चौकामध्ये लटकत ठेवण्यात आले होते. लोकांमध्ये कायद्याचे भय निर्माण व्हावे आणि त्यांनी गुन्हे करु नयेत या उद्देशाने भीती निर्माण करण्यासाठी असं केलं जातं.

येमेन आणि सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील संघटना आणि लष्कर हूती विद्रोह्यांविरोधात युद्ध लढत आहेत. या युद्धामध्ये आतापर्यंत येमेनमधील एक लाख ३० हजार जणांचा मृत्यू झालाय. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांनी केलेल्या दाव्यांनुसार मरण पावलेल्यांमध्ये महिला आणि मुलांचा अधिक सहभाग आहे. हे विद्रोही येमेनच्या सीमा भागाजवळून मागील काही दिवसांपासून सौदी अरेबियामधील तेल डेपो आणि तेल शुद्धीकरण प्रकल्पांवर ड्रोन आणि मिसाइल हल्ले करत आहेत.