जम्मू- काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैन्य आणि सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी संयुक्त पत्रकार परिषद घेत राज्यातील मातांना आवाहन केले आहे. जम्मू- काश्मीरमध्ये आईची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरु शकतो. आम्ही राज्यातील सर्व मातांना विनंती करतोय की तुमची मुलं दहशतवादी मार्गाकडे वळली असतील तर त्यांना सुरक्षा दलांसमोर समर्पण करण्यास सांगा, असे सैन्याचे लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी म्हटले आहे. जो हातात शस्त्र घेईल त्याचा खात्मा केला जाणारच, असे ढिल्लन यांनी ठणकावले आहे.

पुलवामा येथील सीआरपीएफच्या ताफ्यावरील हल्ला हा आदिल दार या दहशतवाद्याने केला होता. आदिल हा पुलवामा येथील रहिवासी असून तो मार्च २०१८ मध्ये जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. या पार्श्वभूमीवर सीआरपीएफ, सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली. पुलवामा येथे दहशतवादी हल्ला झाल्याच्या १०० तासांच्या आत आम्ही जैश- ए- मोहम्मदच्या काश्मीरमधील कमांडरचा चकमकीत खात्मा केला, अशी माहिती लेफ्टनंट जनरल के जे एस ढिल्लन यांनी दिली.

जम्मू- काश्मीरमध्ये अशा स्वरुपाचा आत्मघातकी हल्ला बऱ्याच वर्षांनी घडवण्यात आला आहे. आम्ही या हल्ल्याची चौकशी करत आहोत. जैश- ए- मोहम्मदने पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि पाक सैन्याच्या मदतीनेच हा हल्ला केल्याचा दावा या संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आला आहे.

जम्मू- काश्मीरमधील तरुणांचे दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गेल्या तीन महिन्यांत स्थानिक तरुण दहशतवादी संघटनेत सामील झालेला नाही. यात कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे स्थानिक तरुणांनी दहशतवादी संघटनेत सामील होण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी कुटुंबीयांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जम्मू- काश्मीर पोलिसांनी म्हटले आहे.