Pulwama Terror Attack: जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या ४० जवानांपैकी २३ जवानांचे कर्ज स्टेट बँक ऑफ इंडियाने माफ केले आहे. तसेच शहीद झालेल्या ४० जवानांच्या कुटुंबीयांना विम्याचे पैसे तत्काळ दिले जातील, असे देखील बँकेने जाहीर केले आहे.

पुलवामा येथे गुरुवारी दहशतवाद्याने सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर देशभरातून शहीद जवानांच्या कुटुंबीयांना मदतीचा ओघ सुरु झाला आहे. आता स्टेट बँकेनेही शहीद झालेल्या ४० पैकी २३ जवानांचे कर्ज माफ केले आहे. “शहीद झालेल्या जवानांपैकी २३ जणांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची उर्वरित रक्कम माफ केली जात आहे”, अशी माहिती बँकेने दिली आहे.

सीआरपीएफचे सर्व जवान हे स्टेट ऑफ इंडियाचे ग्राहक आहेत. त्यांचा पगार हा स्टेट बँकेच्या खात्यात जमा होतो. बँकेच्या विमा सुरक्षेच्या नियमानुसार संरक्षण दलातील जवानांना ३० लाख रुपयांचे विमा कवच असते. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना ही रक्कम तत्काळ दिली जाईल, असे आश्वासनही बँकेने दिले आहे.

याशिवाय बँकेने ‘भारत के वीर’ या उपक्रमासाठी यूपीआय सेवा उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच onlinesbi.com या संकेतस्थळावर लॉग इन करुन <Payment/Transfer -> Donations -> Bharat Ke Veer> या माध्यमातून शहीदांच्या कुटुंबीयांना मदत करता येणार आहे.

एसबीआयच्या कर्मचाऱ्यांनी यापूर्वीही कठीण प्रसंगात देशाला मदत केली आहे. यावेळीही बँकेच्या कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने या जवानांच्या कुटुंबीयांना मदत करावी, असे आवाहन बँकेचे प्रमुख रजनीश कुमार यांनी केले आहे.