अमृतसर येथील चौडा बाजार परिसरात झालेल्या रेल्वे अपघातात 50 पेक्षा जास्त लोक मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दसऱ्याच्या सणानिमीत्त चौडा बाजार परिसरात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याचवेळी पठाणकोटवरुन अमृतसरच्या दिशेने येणारी गाडी पुतळ्याला धडकून हा मोठा अपघात घडल्याचं समोर येतंय. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेवेळी परिसरात 200 पेक्षा जास्त लोकांचा समुदाय हजर होता. त्यामुळे या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे.

दरम्यान अपघातानंतर रेल्वेचे अधिकारी, स्थानिक पोलिस व वैद्यकीय अधिकारी घटनास्खळी रवाना झाले आहेत. अपघातात जखमी लोकांना अमृतसर व नजिकच्या परिसरात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या घटनेची पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी दखल घेतली असून, आपला नियोजीत इस्त्राईल दौरा रद्द करुन त्यांनी दिल्लीवरुन अमृतसरला जाण्याचा निर्णय घेतला आहे. याचसोबत अपघातात मृत्यूमुखी पावलेल्या मृतांच्या नातेवाईकांना सरकारतर्फे 5 लाखांची मदत घोषित करण्यात आलेली आहे. याचसोबत या अपघातात जे लोकं जखमी झाले आहेत, त्यांच्यावर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार करण्यात येणार आहेत.

खबरदारीचा उपाय म्हणून स्थानिक जिल्हा प्रशासनाने परिसरातील सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या रद्द केल्या असून, सर्व डॉक्टरांना कामावर तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले आहेत. या अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की अनेक लोकांच्या शरीराचे तुकडे परिसरात पडलेले पहायला मिळाले. स्थानिक लोकांनी या अपघाताला रेल्वे प्रशासन व दसरा आयोजन समितीला जबाबदार धरलं आहे.