अमेरिका आणि इराणमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कतारचे राजे एमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी रविवारी इराणचा दौरा केला. सध्या प्रदेशात निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी चर्चा आवश्यक असल्याचे मत एमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांनी व्यक्त केले. ते इराणचे राष्ट्राध्यक्ष हसन रौहानी यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

प्रादेशिक संकटातून मार्ग काढण्यासाठी तणाव कमी करणे हा एकमेव मार्ग उरतो, यावर दोन्ही बाजूंचे एकमत आहे असे कतारचे राजे म्हणाले. अमेरिका आणि इराणमधील संघर्षपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कतारच्या राजांनी हा दौरा केला. “दोन्ही बाजूंनी चर्चा करुन तणाव कमी करण्याचा प्रयत्न करणे हाच एकमेव मार्ग उरतो” असे एमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी म्हणाले.

“आम्ही प्रदेशाच्या सुरक्षिततेला पहिले प्राधान्य देतो. संपूर्ण प्रदेशाच्या सुरक्षेसाठी आम्ही यावर अधिक चर्चा आणि सहकार्य करण्याचे ठरवले आहे” असे हसन रौहानी म्हणाले. २०१७ च्या मध्यावर सौदी अरेबिया आणि त्यांच्या मित्र देशांनी कतारवर बहिष्कार घातल्यानंतर इराणने केलेल्या सहकार्याबद्दल शेख तमीम यांनी इराणचे आभार मानले.

इराकमधील अमेरिकी सैन्य तळावर पुन्हा क्षेपणास्त्र हल्ला
आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना, अमेरिकेच्या हवाईदलाच्या तळावर पुन्हा एकदा क्षेपणास्त्र हल्ला करण्यात आला आहे. साधारण चार क्षेपणास्त्रे डागण्यात आल्यानंतर घडलेल्या विस्फोटात इराकी हवाई दलाचे दोन अधिकारी आणि दोन सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री उशीरा ही माहिती समोर आली आहे. बगदादपासून साधारण ७० किलोमीटर उत्तरेस स्थित असलेल्या अल-बलाद हवाईतळावर कत्युशा श्रेणीचे आठ रॉकेट सोडण्यात आले होते.