बाराहून अधिक पंतप्रधान पाहणाऱ्या राणी एलिझाबेथ

सर्वाधिक काळ ब्रिटनच्या सम्राज्ञी राहण्याचा विक्रम
ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर्वाधिक काळ सम्राज्ञी राहण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी २३२२६ दिवस १६ तास ३० मिनिटे (भारतीय वेळेनुसार ५.३० पर्यंत) इतका काळ हे पद भूषवले. थेम्स नदी किनारी चार तोफांची सलामी त्यांना देण्यात आली. त्यांनी बुधवारी एडिंबर्ग ते ट्विड बँक असा रेल्वे प्रवासही केला.
राणी एलिझाबेथ यांनी केप टाऊनमधील भाषणात असे सांगितले होते, की माझे आयुष्य कमी असो की जास्त मी तुमच्या सेवेत राहीन. राणी व्हिक्टोरिया यांच्यापेक्षा त्यांची कारकीर्द वेगळीच राहिली. त्यांनी विन्स्टन चर्चिल यांच्यासह बाराहून अधिक पंतप्रधान पाहिले. अनेकदा त्यांनी राजकीय हस्तक्षेपही केला. २००८ च्या आर्थिक पेचप्रसंगा वेळी त्यांनी अर्थतज्ज्ञांना हा पेच तुम्हाला आधी का कळला नाही असा जाबही विचारला होता. युवराज्ञी डायनाच्या मृत्यूनंतर संशयाचे वादळ त्यांच्या जीवनातील वेगळा काळ होता. त्यांनी वलयांकित व्यक्ती व प्रसिद्धी यात कधी गल्लत केली नाही, व्यक्तिगत आयुष्य कधी खुले केले नाही. त्यांनी त्यांच्या काळात अमेरिकेचे बारा अध्यक्ष व सात पोप पाहिले. त्या ख्रिश्चन आहेत पण धर्मप्रसारावर त्यांचा विश्वास नाही. त्यांनी ब्रिटनमधील अनेक सामाजिक, वैज्ञानिक व राजकीय स्थित्यंतरे पाहिली. त्यांच्याकडे लॅब्रॉडॉर व कॉर्गी हे श्वान आहेत. त्यांना घोडय़ांचीही आवड आहे.

२१ एप्रिल १९२६ : युवराज्ञी एलिझाबेथ अलेसांद्रा मेरी यांचा जन्म. राजे जॉर्ज (सहावे) व राणी एलिझाबेथ यांची कन्या.
१० डिसेंबर १९३६ : एलिझाबेथ या राजे एडवर्ड (आठवे) यांच्यानंतर सिंहासनाच्या दावेदार
१३ ऑक्टोबर १९४० : एलिझाबेथ यांचे वयाच्या १४ व्या वर्षी बीबीसीवर पहिले भाषण.
२० नोव्हेंबर १९४७ : एलिझाबेथ यांचा युवराज फिलीप माउंटबॅटन यांच्याशी विवाह.
१४ नोव्हेंबर १९४८ : युवराज चार्लस यांचा जन्म. आता ते प्रिन्स ऑफ वेल्स आहेत
१५ ऑगस्ट १९५० : एलिझाबेथ यांना कन्या रत्न. अ‍ॅनेचा जन्म.
२ जून १९५३ : वेस्टमिनस्टर अ‍ॅबे येथे वयाच्या २५ व्या वर्षी राजे जॉर्ज सहावे यांच्या मृत्यूनंतर सिंहासनावर विराजमान.
१९ फेब्रुवारी १९६० : राणी एलिझाबेथ यांच्या अँड्रय़ू या तिसऱ्या मुलाचा जन्म.
१० मार्च १९६४ : एडवर्ड या चौथ्या मुलाचा जन्म.
मे १९६५ : पश्चिम जर्मनीला ऐतिहासिक भेट.
१९७७ : एलिझाबेथ यांची सिंहासनावर २५ वर्षे पूर्ण.
३१ ऑगस्ट १९९७ : युवराज्ञी डायनाचा पॅरिसमध्ये मोटार अपघातात मृत्यू. एलिझाबेथ यांचे दूरचित्रवाणीवर भाषण.
२००२ : एलिझाबेथ यांच्या राजवटीस ५० वर्षे पूर्ण. एलिझाबेथ यांच्या आई व बहिणीचा मृत्यू.
मे २०११ : एलिझाबेथ यांची आर्यलडला भेट.
२०१२ : राणीपदाची साठ वर्षे पूर्ण.
९ सप्टेंबर २०१५ : राणी व्हिक्टोरिया यांना मागे टाकून सर्वाधिक काळ ब्रिटनची सेवा करण्याचा विक्रम.