जोधपूर येथे वाहन ट्रकला धडकले; इतर पाच जण जखमी

राजस्थानातील जोधपूर येथे झालेल्या रस्ते अपघातात जागतिक कीर्तीचे लोक नृत्यकार क्वीन हरीश व इतर तीन लोक कलावंतांचा मृत्यू झाला, तर इतर पाच जण जखमी झाले आहेत.

जोधपूर येथे महामार्गावरील कापर्डा येथे हा अपघात झाला. हे सर्व जण प्रवास करीत असलेले एसयूव्ही वाहन जैसलमेर येथून अजमेरला जात होते. हे वाहन एका थांबलेल्या ट्रकवर जाऊन आदळले. त्यात हरीश, रवींद्र, भिखे खान, लतीफ खान हे ठार झाले तर इतर पाच जण जखमी झाले, असे बिलारा पोलीस ठाण्याचे अधिकारी सीताराम खोजा यांनी सांगितले.

प्राथमिक चौकशीनुसारहरीश  हे त्यांच्या सहकाऱ्यांसह एका कार्यक्रमासाठी निघाले होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी या कलाकारांच्या निधनाबाबत दु:ख व्यक्त केले आहे. ‘जोधपूर येथे रस्ते अपघातात चार कलाकारांचा झालेला मृत्यू हा चटका लावणारा असून  हरीश  यांनी जैसलमेरला त्यांच्या नृत्य शैलीतून नवी ओळख निर्माण करून दिली होती. त्यांच्या निधनाने लोककलेची मोठी हानी झाली आहे’, असे गेहलोत यांनी म्हटले आहे. हरीश कुमार उर्फ क्वीन हरीश हे मूळ जैसलमेरचे होते. घुमर, कालबेलिया, चांग, भवाई, चारी या नृत्यप्रकारांचा त्यांच्या कार्यक्रमात समावेश असे.