प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर परेडसाठी निघालेल्या आंदोलक शेतकऱ्यांना हरयाणाच्या पलवाल येथे रोखण्यात आल्यानंतर आक्रमक होऊन आंदोलकांनी पोलिसांच्या बॅरिकेट्सची मोडतोड केली होती. याप्रकरणी २००० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, भादंवि कलम १८६, ३३२, ३५३, ३०७, ४२७ तसेच राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम ८ नुसार सुमारे २००० पेक्षा अधिक लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गादपुरी पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबलने याबाबत तक्रार दाखल केली आहे.

तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक हनिष खान म्हणाले, “२००० ते २२०० लोकांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून हे सर्वजण ३५० ते ४०० ट्रॅक्टरवरुन आले होते. सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजेपर्यंत गोदपुरी येथील सोफ्ता गावाजवळ पोलीस अधिकाऱ्यांवर या लोकांनी हल्ला केला, बॅऱिकेट्स आणि कंटेनर्स तोडले. आम्ही या प्रकरणाचा अजून तपास करत असून या लोकांची ओळख पटवण्याचा आणि अटकेची प्रक्रिया सुरु आहे”

आणखी वाचा- शेतकरी आंदोलन हिंसाचार : भाजपाने दिली ‘तिरंगा रॅली’ची हाक; झेंडा घेऊन सहभागी होण्याचं केलं आवाहन

त्याचबरोबर आंदोलक फरिदाबाद जिल्ह्यात प्रवेश करत दिल्लीकडे जाण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना थांबवलं. यावेळी पलवालचे पोलीस अधीक्षक आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना चकवा देत ते ट्रॅक्टरवरुन पळून गेले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांशी चर्चा करत त्यांना पुन्हा पलवालकडे जाण्यासाठी तयार करण्यात यश मिळवले, असेही पोलिसांनी सांगितले.

आणखी वाचा- मेधा पाटकर, योगेंद्र यादव, राकेश टिकैत यांच्यासह २६ शेतकरी नेत्यांवर गुन्हा दाखल

दरम्यान, या घटनेनंतर पुन्हा तणावाचे वातावरण राहू नये, सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होऊ नये तसेच कोणाचा जीव जाऊ नयेत यासाठी खबरदारी म्हणून फरिदाबादमध्ये जमावबंदीचे कलम १४४ लागू करण्यात आले आहेत. पुढील आदेश येईपर्यंत हे आदेश कायम राहणार आहेत.