भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानात घुसून पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असणाऱ्या जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले होते. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचं नुकसान झालं आहे. सध्या टेक्निकल आणि ग्राऊंड इंटेलिजन्सची मर्यादा असल्या कारणाने नेमके किती दहशतवादी मारले गेले आहेत याची नेमकी माहिती देणं थोडं काल्पनिक असेल असंही सांगण्यात आलं आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांकडे सिथेंटिक अपर्चर रडारच्या (SAR) सहाय्याने घेण्यात आलेले फोटो पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. या फोटोंमध्ये टार्गेट करण्यात आलेल्या चार इमारतींना मिराज २००० ने पाच S-२००० प्रिसिजन गायडेड म्युनिशन (PGM) च्या सहाय्याने उद्ध्वस्त करण्यात आल्याचं दिसत आहे.

पाकिस्तानने भारताने हल्ला केल्याचं मान्य केल आहे. मात्र तिथे दहशतवाद्यांचे तळ होते किंवा काही नुकसान झालं आहे हे मान्य करण्यास नकार दिला आहे. एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना विचारलं आहे की, ‘हल्ल्यानंतर पाकिस्तानी लष्करकाने मदरशांना सील का केलं? पत्रकारांना मदरशात का जाऊ दिलं नाही?’.

‘आमच्याकडे SAR च्या सहाय्याने घेण्यात आलेल्या फोटोंच्या स्वरुपात पुरावा आहे की एक इमारत गेस्ट हाऊसप्रमाणे वापरली जात होती. तिथे मौलाना मसूद अझहरचा भाऊ राहत होता. एक एल आकाराची इमारत होती जिथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहत होते. दोन मजल्याच्या एका इमारतीतही प्रशिक्षण घेणारे राहत होते. तसंच एका इमारतीत कॉम्बॅट ट्रेनिंगच्या शेवटच्या टप्प्यात असणारे राहत होते. या सर्व इमारतींना बॉम्बने टार्गेट करत उद्ध्वस्त करण्यात आले’.

अधिकाऱ्याने पुढे बोलताना सांगितलं आहे की, हे फोटो सार्वजनिक करायचे की नाही हा निर्णय राजकीय नेतृत्वाला घ्यायचा आहे. SAR ने घेतलेले फोटो सॅटेलाइट फोटोंइतके स्पष्ट नाही आहेत. मंगळवारी ढग दाटले असल्या कारणाने आम्ही सॅटेलाइच्या सहाय्याने चांगले फोटो घेऊ शकलो नाही. अन्यथा प्रश्नच मिटला असता’.

अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितलं की, ‘मदरशांची निवड सावधगिरी बाळगून करण्यात आली होती कारण ही जागा निर्मनुष्य ठिकाणी होती, तसंच सामान्य नागरिक मारले जाण्याचीही भीती होती. पण हवाई दलाला योग्य वेळी अचूक माहिती मिळाली’. भारतीय हवाई दलाने हल्ल्यात इस्त्राइल बनावटीच्या बॉम्बचा वापर केला. हे बॉम्ब फक्त इमारत नष्ट करत नाहीत तर इमारतीच्या आतमध्ये घुसून नुकसान करतात.

हल्ला झालेली जागा सध्या पाकिस्तानी लष्कराने सील केली आहे. त्यामुळे कोणतीही माहिती मिळवणं गुप्तचर यंत्रणांसाठी कठीण होती आहे. त्यामुळे एअर स्ट्राइकमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा आकडा सध्या काल्पनिक आहे असं अधिकाऱ्याने सांगितलं आहे.