रेडिओ मिर्ची या सुप्रसिद्ध रेडिओ चॅनलची रेडिओ जॉकी तान्या खन्नाचा नोएडा या ठिकाणी झालेल्या अपघातात मृत्यू झाला आहे. तान्या खन्ना आपल्या कारने भरधाव वेगात निघाली होती. नोएडा येथील सेक्टर ९४ जवळ ती पोहचली होती. मात्र त्याचवेळी कारच्या वेगाचे नियंत्रण सुटले आणि तान्या खन्नाची कार नाल्यात जाऊन पडली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी कार नाल्याबाहेर काढली. तसेच रेडिओ जॉकी तान्या खन्नाला रूग्णालयातही दाखल केले. मात्र रुग्णालयात घेऊन गेल्यानंतरच डॉक्टरांनी तान्या खन्नाला मृत घोषित केले. तान्या खन्ना रेडिओ मिर्चीची ग्रुप मॅनेजर होती असेही समजते आहे.

तान्या खन्नाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. शव विच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच तिच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

तान्या खन्ना गाजियाबादमध्ये राहात होती. तिथून ती नोएडा या ठिकाणी असलेल्या तिच्या ऑफिसमध्ये चालली होती. पोलिसांनी तान्या खन्नाचा मृतदेह शवविच्छेदनसाठी पाठवला आहे. रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला अशी माहिती समोर आली आहे. तान्या खन्ना भरधाव वेगात कार का चालवत होती हे स्पष्ट झालेले नाही. तिने ड्राईव्ह करताना दारू प्यायली होती का? हे देखील शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या नाल्यात तान्याची कार पडली त्या नाल्यात साधारण चार फूट खोल घाणेरडे पाणी होते. हे पाणी नाकातोंडात गेल्यामुळेच तान्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतो आहे. मात्र ती भरधाव वेगात कार का चालवत होती हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवालानंतरच तान्याच्या मृत्यूचे कारण समजू शकणार आहे.