राफेल करारावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारला लक्ष्य केले आहे. ‘राफेल करारात सुप्रीम कोर्टात मोदी सरकारने चोरी केल्याची कबुली दिली. सरकारने ३० हजार कोटी रुपये अंबानीच्या खिशात घातले. पिक्चर अभी बाकी हे मेरे दोस्त’, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

राफेल करारावरुन काँग्रेस आक्रमक असून या करारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राफेल खरेदी प्रकरणात सोमवारी केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टात कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांमधून राफेल करारप्रकरणी घोषणेपूर्वी सरकारच्या वतीने हवाई दलाशी चर्चा करण्यात आली नाही, अशी माहिती उघड झाल्याचे वृत्त न्यूज सेंट्रल २४ X ७ या इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.

मंगळवारी राहुल गांधी यांनी ही बातमी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला. ‘सुप्रीम कोर्टात मोदींनी चोरी केल्याची कबुली दिली. प्रतिज्ञापत्रात सरकारने हे मान्य केले की हवाई दलाशी चर्चा न करताच मोदी सरकारने करारात बदल केले आणि ३० हजार कोटी रुपये अंबानींच्या खिशात घातले. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त’, असे ट्विट त्यांनी केले आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वीही राफेल करारावरुन गंभीर आरोप केले होते. ‘डासू’ या कंपनीने अनिल अंबानींच्या कंपनीला २८४ कोटी रुपये दिले. यातूनच अनिल अंबानी यांनी नागपूरमध्ये जमीन विकत घेतल्याचा आरोप त्यांनी केला होता. अंबानींची निवड व्हावी, यासाठी मोदी सरकारने प्रयत्न केल्याचा काँग्रेसचा दावा आहे. या आरोपांवर ‘डासू’ या कंपनीचे सीईओ एरिक त्रपिएर यांनी मंगळवारी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. यात एरिक यांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.