“इंडियन एअर फोर्समध्ये राफेल फायटर विमानांचा समावेश हा संपूर्ण जगासाठी आणि खासकरुन आमच्या सार्वभौमत्वावर नजर ठेवणाऱ्यांसाठी एक मोठा आणि कठोर संदेश आहे”, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह अंबाला हवाई तळावरील कार्यक्रमात बोलताना म्हणाले.  राजनाथ सिंह यांनी नाव न घेता चीनला इशारा दिला.

“सध्या आमच्या सीमेवर जी स्थिती आहे किंवा मी म्हणेन, जी स्थिती निर्माण करण्यात आलीय, त्या पार्श्वभूमीवर राफेलचा इंडियन एअर फोर्समध्ये समावेश खूप महत्त्वाची गोष्ट आहे” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.

“नुकत्याच झालेल्या परदेश दौऱ्यात मी भारताचा दृष्टीकोन जगासमोर मांडला. कुठल्याही परिस्थितीत आम्ही सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी अजिबात तडजोड करणार नाही. भारताचा हा निर्धार असून, त्याची मी कल्पना दिली आहे. सार्वभौमत्वासाठी शक्य ते सर्व करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत” असे राजनाथ सिंह म्हणाले.

“अलीकडेच सीमेवर घडलेल्या दुर्देवी घटनेनंतर इंडियन एअर फोर्सने ज्या वेगाने आणि विचारपूर्वक जलदगतीने पावले उचलली, त्यातून तुमची कटिबद्धता दिसून येते. त्याबद्दल मी इंडियन एअर फोर्समधल्या माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो” असे राजनाथ सिंह म्हणाले.

“एअर फोर्सने ज्या वेगाने, सीमेजवळच्या फॉरवर्ड बेसवर फायटर विमानांची तैनाती केली, त्यातून एअर फोर्स पूर्णपणे सज्ज असल्याचा विश्वास निर्माण झाला” असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. “IAF मध्ये राफेलचा समावेश हे भारत-फ्रान्स दृढ संबंधांचे प्रतीक आहे. दोन्ही देशांमधील रणनितीक संबंध सुद्धा भक्कम झाले आहेत” असे राजनाथ सिंह म्हणाले.