फ्रान्सने पहिलं राफेल भारताच्या ताब्यात दिलं. राफेलची निर्मिती दसॉल्ट या फ्रान्सच्या कंपनीने केली आहे. तसंच यावर मिटिऑर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, हवेतून हवेत मारा करण्याची क्षमता त्यामध्ये आहे. आज दसरा असल्याने भारताच्या ताब्यात हे पहिलं विमान देण्यात आलं. हे लढाऊ विमान असल्याने आणि आज दसरा असल्याने या पहिल्या विमानाची पूजा करण्यात आली. राफेलवर कुंकवाच्या बोटाने ओम काढण्यात आला. तसंच या विमानाच्या चाकाखाली दोन लिंबं ठेवण्यात आली. तसंच नारळ आणि फुलं ठेवून राफेलची पूजा करण्यात आली. हे विमान आता भारतीय वायुदलाची ताकद वाढवणार आहे.

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन राहुल गांधी आणि काँग्रेस यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. तसंच मोदींनी या प्रकरणी अनिल अंबानी यांना ३० हजार कोटींचा फायदा करुन दिला असाही आरोप केला होता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्र सरकारने राफेल घोटाळा केला हा आरोप विरोधक आणि राहुल गांधी सातत्याने करत राहिले. संसदेबाहेर आंदोलनंही करण्यात आली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. उलट विरोधकच या आरोपांवरुन तोंडघशी पडले. भाजपाला ३०३ जागा मिळाल्या आणि प्रचंड बहुमातने पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले.  एकूण ३६ राफेल विमानं फ्रान्स भारताला देणार आहे. यासंदर्भातला करार झाला आहे. या करारातले पहिले विमान भारताला सुपूर्द करण्यात आले.

दसऱ्याच्या मुहूर्तावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राफेल विमानाची पूजा केली. या विमानावर ओम असे कुंकुवाने लिहिण्यात आले. रक्षासूत्र बांधण्यात आले. तसंच चाकांखाली दोन लिंबंही ठेवण्यात आली. राफेल हे आधुनिक सोयी सुविधा असलेलं विमान आहे. पहिल्या राफेलच्या यशस्वी उड्डाणासाठी पारंपारिक लिंबांचा उतारा ठेवण्यात आल्याचं दिसून आलं.