बिहारमधील दरभंगा वैद्यकिय महाविद्यालयातील ५४ विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणात दोषी ठरवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ज्यांनी रॅगिंग केले त्यांना आणि ज्यांच्यावर झाले त्यांनाही या प्रकरणात शिक्षा करण्यात आली आहे. दोषी ठरवलेल्या ५४ विद्यार्थिनींना कॉलेज प्रशासनाने २५ हजारांचा दंड ठोठावला आहे. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अशाप्रकारे विद्यार्थ्यांना रँगिंग प्रकरणात दंड करण्याची राज्यातील १५ दिवसांमधील ही दुसरी घटना आहे.

दरभंगा महाविद्यालयाने दोषी ठरवलेल्या विद्यार्थिनी या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या आहेत. दुसऱ्या वर्षांतील विद्यार्थिनींना रॅगिंग केल्याप्रकरणी दोषी ठरवले तर ज्यांच्यावर रॅगिंग झाले त्या पहिल्या वर्षातील विद्यार्थिनींना रॅगिंग करणाऱ्यांना ओळखण्यास नकार दिल्याबद्दल शिक्षा करण्यात आली आहे. महाविद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. आर. के. सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थिनीने शनिवारी या प्रकरणासंदर्भात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर महाविद्यालयाने या संदर्भात योग्य ती कारवाई करुन दोषींनी शिक्षा द्यावी असे मेडिकल कौन्सिलने आम्हाला कळवल्याचे प्राचार्यांनी सांगितले. त्यानंतर कॉलेजच्या रॅगिंगविरोधी समितीची बैठक घेण्यात आली. त्यामध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानंतर या ५४ विद्यार्थिंनीवर कारवाई करण्यात आल्याचे ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

मुलींच्या वसतीगृहात जाऊन रॅगिंगविरोधी समितीने तपास केला. मात्र कोणीही भीतीपोटी या घडलेल्या प्रकरणाबद्दल माहिती दिली नाही. दोषी आणि रॅगिंगला बळी पडलेल्यांनी कोणतीच माहिती न दिल्याने मेडिकल कौन्सिलच्या नियमांप्रमाणे वसतीगृहातील सर्वच्या सर्व म्हणजे ५४ विद्यार्थिनींना दोषी ठरवून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड करण्यात आल्याची माहिती प्राचार्यांनी दिली. ही रक्कम २५ नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थिनींनी कॉलेजमध्ये जमा केली नाही तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाचे म्हणणे आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला भागलपूरमधील जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील ३३ विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला होता. दुसऱ्या वर्षातील विद्यार्थ्यांनी रॅगिंगच्या नावाखाली पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा छळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.