करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशभरात २१ दिवसांचं लॉकडाउन जाहीर केलं. यानंतरही देशातली परिस्थिती लक्षात घेता काही राज्यांमध्ये हे लॉकडाउन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. मात्र या लॉकडाउनचा भारतीय अर्थव्यस्थेवर मोठा परिणाम होत आहे. अनेक कंपन्या या काळात बंद असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसतोय. याचसोबतच लॉकडाउनमुळे अनेक छोटे उद्योगधंदे, शेतकरी यांच्यावरही परिणाम होत आहे. अशा खडतर परिस्थितीत सरकारने विचारल्यास आपण मदत करायला तयार असल्याचं मत रिझर्व्ह बँकेचे माजी अध्यक्ष रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. ते NDTV वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.

“सध्याच्या घडीला संपूर्ण जग हे आर्थिक मंदीच्या दिशेने झुकत चाललेलं आहे. पुढील वर्षात मला आशा आहे की ही परिस्थिती सुधारलेली असेल. मात्र सध्या करोनाविरुद्ध लढण्यासाठी आपण काय पावलं उचलत आहोत, त्यावर हे अवलंबून असणार आहे. भारतासाठी परकीय चलन हा नेहमी चिंतेचा विषय राहिलेला आहे. सध्या इतर विनकसनशील देशांच्या तुलनेत आपली परिस्थिती ही चांगली आहे. डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण हा देखील एक चिंतेचा विषय आहेच, मात्र ब्राझील सारख्या देशात सध्याची असलेली परिस्थिती पाहता भारतामध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. अशा परिस्थितीत सरकारने त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्यायला हवा मग ते विरोधी पक्षातलेही का असेना…” रघुराम राजन भारताच्या आर्थिक परिस्थितीबद्दल बोलत होते. याचसोबत सध्याच्या परिस्थितीत सरकारने आपल्याला मदत मागितली तर आपण तयार असल्याचंही राजन यांनी स्पष्ट केलं.

दरम्यान, करोनामुळे जगासमोर उभ्या राहिलेल्या आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणात्मक मुद्द्यांवर सल्लामसलतीसाठी एका गटाची स्थापना आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने केली आहे. त्यात रघुराम राजन यांच्यासह ११ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक व प्रमुख क्रिस्टॅलिना जॉर्जिव्हा यांनी ही निवड केली असून, इतर सदस्यात सिंगापूरचे वरिष्ठ मंत्री थरमन शण्मुगरत्नम, मॅसॅच्युसेटस इन्स्टिटय़ूटचे प्राध्यापक क्रिस्टिन फोर्बस, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केव्हीन रूड, संयुक्त राष्ट्रांचे माजी उप महासचिव लॉर्ड मार्क मलोच ब्राऊन यांचा समावेश आहे.