पाऊस, गारपीटग्रस्तांना केंद्र सरकारचे मदतीचे आश्वासन
देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून त्यांना मदत करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलण्याची मागणी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी लोकसभेत केली. बाधित राज्यांकडून याबाबतचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर सरकार योग्य ती पावले उचलेल, असे आश्वासन सरकारच्या वतीने देण्यात आले.
सभागृहाच्या कामकाजाला सुरुवात होताच राहुल गांधी यांनी पिकांच्या नुकसानीचा प्रश्न उपस्थित केला आणि सरकारने त्वरित पावले उचलण्याची मागणी केली. पिकांच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी सरकारने पथक पाठवावे आणि मंत्र्यांनी त्याबाबत सभागृहात निवेदन करावे, अशी मागणी गांधी यांनी केली. बाधित शेतकऱ्यांना त्वरेने मदत द्यावी आणि गेल्या वेळेप्रमाणे मदत पोहोचण्यास विलंब होऊ नये, असेही ते म्हणाले.
अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे जे नुकसान झाले त्याबाबत राज्यांकडून येत्या तीन-चार दिवसांत अहवाल प्राप्त होण्याची अपेक्षा आहे, असे कृषिमंत्री राधामोहन सिंह यांनी सांगितले. सदर अहवाल प्राप्तच झाल्यानंतर सरकार आवश्यक ती पावले उचलेल, असेही ते म्हणाले. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि पंजाबच्या कृषिमंत्र्यांशी आपली चर्चा झाली असल्याचेही कृषिमंत्र्यांनी सांगितले. विविध ठिकाणी झालेल्या पिकांच्या नुकसानीचा अंदाज घेऊन आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.