म. गांधीजींचा भारत की एका हातात प्रेम आणि दुसऱ्या हातात तिरस्कार असलेला नथुराम गोडसे यांचा भारत यामधून तुम्हाला निवड करावयाची आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी येथे पक्षाच्या बुथ कार्यकर्त्यांसमोर स्पष्ट केले.

लोकसभेच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी बुथ कार्यकर्त्यांसमोर वरील बाब स्पष्ट केल्यानंतर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राफेल करार, रोजगारनिर्मिती, राष्ट्रीय सुरक्षा आणि कृषीक्षेत्राची अवस्था आदी मुद्दय़ांवरून जोरदार हल्ला चढविला. तुम्हाला  गांधीजींचा भारत हवा आहे की एका हातामध्ये प्रेम आणि बंधुत्व असलेला आणि दुसऱ्या हातामध्ये तिरस्कार आणि भीती असलेला गोडसेंचा भारत हवा आहे याचा निर्णय तुम्ही घ्यावयाचा आहे, असे गांधी म्हणाले.

गांधीजी निर्भय होते, त्यांनी अनेक वर्षे तुरुंगवास भोगला, परंतु ते ब्रिटिशांशी प्रेमाने बोलले, तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांना पत्रे लिहून दिलगिरी व्यक्त केली आणि माफीची विनंती केली, असेही राहुल गांधी म्हणाले.

पुलवामात जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले, या संघटनेचा म्होरक्या मसूदला भाजपने कारागृहातून सोडले. आपले दोन पंतप्रधानही शहीद झाले, मात्र आम्ही कोणासमोर नतमस्तक झालो नाही, असेही काँग्रेसचे अध्यक्ष म्हणाले.

मेक इन इंडिया मेड इन चायना : पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मेक इन इंडियाबाबत बोलतात, मात्र त्यांचा शर्ट, जोडे आणि ज्याने ते सेल्फी घेतात तो भ्रमणध्वनी मेड इन चायना आहेत, अशी टीकाही गांधी यांनी या वेळी केली.