अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बोलबाला होत असताना काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कथित अमेरिका दौऱ्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ आली आहे. एस्पेन येथे एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्यासाठी परदेशवारीवर गेलेल्या राहुल यांच्यावर भाजपने जोरदार टीका केली होती. त्यावर चवताळलेल्या काँग्रेस नेत्यांनी राहुल गांधी यांच्या कार्यालयाने ट्विटरवरून प्रसिद्ध केलेल्या छायाचित्राचा संदर्भ देत प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांचा परदेश दौरा ऐन वेळी ठरला व त्यामागे बिहार काँग्रेसमधील गैरव्यवस्थापन असल्याचा दावा पक्षसूत्रांनी केला.
काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी यापूर्वीच राहुल एस्पेन दौऱ्यावर असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. छायाचित्र प्रसिद्ध झाले आहे. तरी त्यांच्या परदेशवारीमागे बिहार निवडणूक असल्याचे बोलले जाते. काँग्रेसकडून राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांना बिहारची जबाबदारी सोपवली होती. याखेरीज राहुल यांनी १९ जणांची समिती नेमून त्यामार्फत नियोजन सुरू केले होते. ज्यात औरंगाबाद (बिहार) मधील काँग्रेस नेते व राहुल यांचे निकटवर्तीय निखिलकुमार यांना अधिकार देण्यात आले. मात्र प्रदेशाध्यक्ष अशोक चौधरी यांनी निखिलकुमार यांचे महत्त्व कमी करण्यासाठी समितीने सुचविलेल्या उमेदवारांना डावलले. अवघ्या चाळीस जागी निवडणूक लढवीत असताना उमेदवारी वाटप मनाप्रमाणे न झाल्याने राहुल गांधी कमालीचे नाराज झाले. शिवाय गुलाम नबी आझाद यांनीदेखील बिहारच्या निवडणुकीत फारसा रस घेतला नाही.

गुजरातमध्ये मोबाइल, इंटरनेटवर बंदी का?
पटेल आरक्षण आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर गुजरातमध्ये मोबाइल व इंटरनेट वापरावर बंदी घालणाऱ्या भाजप नेत्यांना डिजिटल इंडिया मिशनची आठवण आली नाही का, असा प्रश्न काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी उपस्थित केला. दूरसंचार व तंत्रविज्ञान क्रांती भारतात यापूर्वीच झाली असल्याचा दावा त्यांनी केला. परदेशातून मोदींना देशांतर्गत ठप्प झालेली गुंतवणूक, शेतकरी समस्या, घटणारे कृषी उत्पादन, वाढती बेरोजगारी दिसत नाही, अशी टीका त्यांनी केली.