पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या भाषणातून तिरस्कार पसरवण्याचं काम करत आहेत. ते कधीही कुणाबद्दलच चांगलं बोलू शकत नाहीत असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. केरळमधल्या कोझिकोड या ठिकाणी राहुल गांधी यांची सभा होती त्यावेळी राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, सीपीएम आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर टीका केली. सीपीएम या पक्षाने केरळमध्ये हिंसा पसरवण्याचं काम केलं. भाजपा आणि संघ यांच्याप्रमाणेच हिंसा पसरवण्याचं काम सीपीएम करत असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला.

मला सीपीएमला प्रश्न विचारायचा आहे की जेव्हा केरळमध्ये महापूर आला होता, तेव्हा सीपीएम हा पक्ष कुठे होता? केरळमध्ये पूर आला होता तेव्हा १० हजार कुटुंबं पूरग्रस्त झाली त्यांच्यासाठी सीपीएमने काय केलं? सीपीएम फक्त हिंसा पसरवण्याचं काम करते आहे. जे कमकुवत असतात त्यांना हिंसेचा आधार घ्यावा लागतो. सीपीएम तर इतकी कमकुवत आहे की त्यांच्या शेवटच्या घटका सुरु आहेत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

त्याचप्रमाणे राहुल गांधी यांनी भाजपा आणि संघावरही निशाणा साधला. भाजपा आणि संघावरही त्यांनी हिंसाचाराचा आरोप केला आहे. इतकंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त द्वेष पसरवण्याचं काम करत आहेत. त्यांना कोणाबद्दलही चांगलं बोलता येत नाहीत. ते फक्त अनिल अंबानी यांचा आदर करतात असाही आरोप राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केला. येणाऱ्या लोकसभा निवडणूक ही दोन विचारधारांची लढाई आहे, हा विचारधारांचा संघर्ष आहे असंही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.