काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या कार्यालयाचे ट्विटर अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. ५६ दिवसांच्या सुट्टीवरुन परतल्यानंतर राजकारणात चांगलेच सक्रिय झालेले दिसून येत आहेत. याचेच आणखी एक उदाहरण म्हणजे आतापर्यंत सोशल मीडियापासून दूर राहणाऱ्या राहुल गांधी यांनी ट्विटरवर आपले अकांऊट सुरु केले आहे. मात्र,  स्वत:च्या नावे हे अकाऊंट सुरू करण्याऐवजी राहुल गांधी यांच्या कार्यालयाच्या नावाने अकाऊंट सुरू करण्यात आले आहे. @OfficeOfRG असे राहुल गांधी यांचे ट्विटर हॅण्डल असून एकाच दिवसात १७ हजार फॉलोअर्सचा आकडा गाठला आहे. अद्याप राहुल गांधी यांनी यावरून एकही ट्विट केले नसले तरी तेलंगणामध्ये १५ किमी पदयात्रा करणार असल्याची माहिती देणारे ट्विट राहुल यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच राहुल यांनी संसदेत अमेठीच्या फूड पार्कचा मुद्दा उचलून धरल्याचा व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे.