केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेले शेतकरी आंदोलन आता अधिकच तीव्र होऊ लागले आहे. हे आंदोलन करताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी, आज शेतकरी संघटनांच्यावतीने देशभरात श्रद्धांजली सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय, त्यांनी मृत्युमुखी पडलेल्या शेतकरी बांधवांना श्रद्धांजली देखील अर्पण केली आहे.

“शेतकऱ्यांच्या संघर्ष व त्यागाचे नक्कीच फलित होईल! शेतकरी बंधू-भगिनींना नमन आणि श्रद्धांजली.” अशा शब्दांमध्ये राहुल गांधी यांनी ट्विट केले आहे. तसेच, आंदोलन करताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या फोटोंचे शेतकरी संघटनांनी बनवलेले पोस्टर देखील शेअर केले आहे.

या अगोदर देखील राहुल गांधींकडून शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर सातत्याने निशाणा साधण्यात आलेला आहे. “सवयीप्रमाणे मोदीजींनी आज पुन्हा एकदा असत्याग्रह केला. शेतकऱ्यांचं म्हणणं ऐका, कृषी कायदे मागे घ्या,” असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मोदी सरकारवर या अगोदर निशाणा साधलेला आहे.

शेतकऱ्यांचं ऐका आणि…; राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींना सल्ला

कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनास आता २५ दिवसांपेक्षाही जास्त दिवस झाले आहेत. मात्र, अद्यापही यावर तोडगा निघालेला नसल्याने हे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान हे आंदोलन करत असताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना आज(रविवार) शेतकरी संघटनांकडून श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. आतापर्यंत या आंदोलनात जवळपास ३० शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे.

शेतकरी आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांसाठी आज देशभर श्रद्धांजली सभांचे आयोजन

देशातील सर्व जिल्हे, तहसील व गावांमध्ये आज(रविवार) श्रद्धांजली सभा होणार आहेत. सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत या श्रद्धांजली सभा पार पडतील. संयुक्त किसान मोर्चाच्यावतीने या श्रद्धांजली सभांसाठी एक पोस्टर देखील तयार करण्यात आले आहे. यामध्ये आंदोलन करताना मृत्यूमुखी पडलेल्या शेतकऱ्यांचे फोटो लावण्यात आले असून, विविध माध्यमांद्वारे ते सर्वत्र पाठवले जात आहेत.

शेतकरी आंदोलनास पाठिंब्यासाठी हनुमान बेनीवील यांचा तीन संसदीय समित्यांचा राजीनामा

याशिवाय सिंधु, टीकरी व गाजीपूर बॉर्डरवरील आंदोलन ठिकाणांवर सभा होणार आहेत. मुख्य आयोजन हे सिंघु बॉर्डरवर असणार आहे. या ठिकाणी सर्व शेतकरी संघटनांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या ठिकाणी आंदोलन करताना मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल व त्यानंतर आंदोलनाबाबत चर्चा केली जाणार आहे.